
फिरोज चाऊस: ‘देवचंद’चे श्रमसंस्कार शिबिर
निपाणी (वार्ता) : आधुनिक काळात भौतिक विकास साधताना पर्यावरणीय घटकांच्या हानीमुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे. मानवाने पर्यावरणामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे पर्यावरणीय असमतोल निर्माण झाला आहे. त्यामुळे ऋतुमान बदल घडून मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे प्रत्येक व्यक्तीचे आद्य कर्तव्य बनले आहे, असे मत सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण प्रेमी नागरिक फिरोज चाऊस यांनी व्यक्त केले. अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालय (कनिष्ठ) राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर आयोजित ‘विशेष श्रमसंस्कार शिबीर’ अर्जुनी येथे सुरू आहे. त्यावेळी ‘पर्यावरण आणि विद्यार्थी’ या विषयावर चाऊस बोलत होते.
चाऊस म्हणाले, पर्यावरण म्हणजेच जीवन ही संकल्पना सर्वसामान्यांमध्ये रुजली पाहिजे. मानवाच्या गरजा भागविण्यासाठी निसर्ग समर्थ आहे. पण मानवाच्या भोगवादी वृत्तीमुळे निसर्ग उद्ध्वस्त होत आहे. औद्योगिक क्रांतीचा परिणाम म्हणून विकास हाच विनाश होतो आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे चांगले शिक्षण आणि आरोग्य सांभाळणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहिले नाही. आरोग्याचे प्रश्न वाढत आहेत. वाढते प्रदूषण, प्लास्टिकच्या दैनंदिन अमर्याद वापरामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून सर्वांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे. कचरा, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. यु. घटेकरी, एनएसएस समिती सदस्य प्राध्यापक, स्वयंसेवक उपस्थित होते. स्वयंसेविका देवकी घोळवे यांनी सूत्र संचालन केले. स्वयंसेवक विश्वजित कांबळे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta