
निपाणी (वार्ता) : डिसेंबर सुरू झाला तसा शहराला नाताळची चाहुल लागली आहे. व्यापारी आणि विक्रेत्यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच ख्रिसमसची तयारी सुरू केली आहे. मात्र, आता ख्रिसमस अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठेत ख्रिसमसच्या खरेदीसाठी गर्दी दिसू लागली आहे.
निपाणी आणि परिसरात ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने ख्रिसमस साजरा करतात. शहरात अनेक चर्च कार्यरत आहेत. या सर्व चर्चमध्ये ख्रिसमसच्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. ख्रिसमस जवळ येईल तसा सर्व चर्चवर विद्युत रोषणाई करून परिसर उजळवला जाणार आहे. त्याचबरोबर बाजारपेठेतही ख्रिसमसची धूम दिसून येत आहे. ख्रिसमस म्हटले की सॅन्ताक्लॉज हमखास येतोच. ही एक मुलांच्या भावविश्वाला आनंदाची किनार लावणारी गोष्ट आहे. सॅन्ता खराच असतो अशा निरागस समजुतीमध्ये वावरणाऱ्या मुलांना ख्रिसमस दिवशी आपल्या उशापाशी भेटवस्तु पाहून होणारा आनंद पालकांचाही आनंद द्विगुणीत करणारा असतो. म्हणूनच बाजारपेठेत सॅन्ताक्लॉजच्या प्रतिकृतींपासून पोषाखापर्यंत तसेच सजावटीच्या अनेक वस्तु दाखल झाल्या आहेत. शहरातील जुना पी. बी. रोड अशोक नगर, कोठीवाले कॉर्नर, नरवीर तानाजी चौक यासह शहरात विविध ठिकाणी ख्रिसमससाठीच्या सजावटीच्या वस्तुंनी स्टॉल सजली आहेत. यामध्ये ख्रिसमस ट्री, त्यावर लावण्यासाठी विद्युत माळा, झिरमिळ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चांदण्यांच्या प्रतिकृती, आकाशदिवे, जिंगलबेल्स, मेंढ्यांच्या प्रतिकृती, ख्रिस्त जन्माचा आकर्षक देखावा, फुगे, वेगवेगळ्या रंगांचे चकाकणारे बॉक्स अशा एक ना अनेक वस्तु लक्ष वेधून घेत आहेत.
—————————————————————–
‘आठवडाभरापासून परिसरातील नागरिकांना ख्रिसमसचे वेध लागले आहेत. त्यामुळे सजावटीचे साहित्य, सांताक्लॉजचे कपडे आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक येत आहेत. येत्या दोन दिवसात खरेदीसाठी गर्दी होणार आहे.’
-अभिषेक गुप्ता,
सजावट साहित्य विक्रेते, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta