सुनील देसाई; ‘देवचंद’च्या शिबिराची अर्जुनीत सांगता
निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजना विभागातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला जातो. संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी यांनी असल्यास विभाग उपयुक्त आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेतून श्रमाचे संस्कार दिले जातात. श्रम प्रतिष्ठेला महत्त्व देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये त्याचे बहुमोल योगदान आहे, असे मत सुनील देसाई यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना सांगता समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिरात विविध कार्यक्रम झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून गावकऱ्यांचे प्रबोधन केले. शिवाय जल संवर्धनाचा संदेश दिला. सात दिवसाच्या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेने पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत जल बंधारा उभा केला. विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या प्रसंगी विविध प्रकारची बौद्धिक व्याख्याने अर्जुनी येथे आयोजित करण्यात आली होती.
प्रा नानासाहेब जामदार यांचे सोशल मीडिया व विद्यार्थी या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. अमोल नारे यांचे मानसिक आरोग्य व काळाची गरज तर प्रा. बी. एस. हिरेमठ यांचे गीत गायन विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रा. एन. डी. कुंभार यांचे अमृत महोत्सवी भारत या विषयावर उपयुक्त व्याख्यान झाले.
सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध प्रकारच्या गटचर्चा आयोजित करण्यात आल्या व त्यातून समाज उपयोगी व व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात माहिती देण्यात आली. बाजीराव चौगुले, सुदाम देसाई, माजी सरपंच वर्षाताई सुतार, नामदेव चौगुले, प्रा.डॉ. राहुल घटेकरी, रवींद्र फडतरे, श्रावणी लोहार, पल्लवी पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रा. टी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. बाजीराव चौगुले यांनी आभार मानले.