रेव्ह. सुनील गायकवाड; निपाणीत ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा
निपाणी (वार्ता) : समस्त मानव जातीसह पशु,पक्षी प्राणी हे सर्वजण देवाच्या कृपा आशीर्वादामुळेच भूतलावर राहत आहेत. भगवान येशू ख्रिस्त त्यांचे संरक्षण करीत आहे. त्यामुळे प्रत्येकाने येशु चे उपकार कधीच विसरू नयेत. परोपकारी वृत्ती बाळगून जीवन जगायला शिका. येशू कधीही कुणाला काहीच कमी करणार नाही. त्यासाठी भक्ती भावाने त्याची अर्चना करा, अशा आवाहन रेव्ह. सुनील गायकवाड यांनी केले.
येथील कोल्हापूर वेस जी आय बागेवाडी कॉलेज समोरील ख्रिश्चन चर्चमध्ये सोमवारी (ता.२५) ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना गायकवाड बोलत होते.
एस.एस. सकट यांनी, येशू ख्रिस्त हा प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी आहे. त्याच्यामुळेच जगातील पाप नष्ट होत आहे. सर्वांचे ज्ञान आणि बुद्धी याला येशू कारणीभूत आहे. मोह, माया, पाप, संकट असलेल्यांना येशु नेहमी सहकार्य करत असल्याचे सांगितले. प्रारंभी सामूहिक प्रार्थना करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. त्यानंतर उपकार स्तुतीची प्रार्थना, स्तोत्र वाचन, शास्त्र वाचन, ख्रिस्त जन्माचे गीत, मध्यस्थीची प्रार्थना करण्यात आली. यावेळी दानार्पन, संदेश, सामूहिक गीत, प्रभूची प्रार्थना आणि आशीर्वचन झाले. तसेच नवीन वर्ष भक्ती कार्यक्रम पार पडला.
यावेळी सचिन हेगडे,रमेश हेगडे, अनिल हेगडे, रमेश सकट, संजय हेगडे, संदेश सुतार, दीपक सकट, योगेश आवळे, अविनाश हेगडे, किसन दावणे, मायकल आवळे, सचिन आवळे, मोशे सकट, अतुल सकट, समीर हेगडे यांच्यासह महिला व ख्रिस्त समाजबांधव उपस्थित होते.