राजू पोवार; रयत संघटनेतर्फे निषेध
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि कर्जमाफीची सवय लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची गरज नाही. सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधामुळे शेतकरी आळशी बनत चालले आहेत, असे वक्तव्य राज्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे. या वक्तव्याचा कर्नाटक राज्य रयत संघटनेने निषेध व्यक्त केला असून साखर मंत्र्यांनी शेतकऱ्याबद्दल अपशब्द काढल्याने त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. अन्यथा साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा, कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला.
साखरमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत संघटनेची बैठक घेऊन निषेध व्यक्त करून ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, बेळगाव येथे झालेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या योग्य असल्याचे म्हटले होते. याशिवाय सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे. साखर मंत्र्यांनी उसापासून पासून उपपदार्थ बनवणाऱ्या कारखान्यासह सरकारने प्रति टन जादा रक्कम देणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
याउलट अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. एका जबाबदार मंत्र्यांना शेतकऱ्याविरोधीचे वक्तव्य शोभत नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांना विरोध करणाऱ्या मंत्र्यांची गरज राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची माफी न मागता तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा रयत संघटना आंदोलन केल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष बंटी पाटील, बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, मधुकर पाटील, नितीन कानडे, मयूर पोवार, एकनाथ सादळकर, बबन जामदार, चिनू कुळवमोडे, सागर पाटील, सुभाष खोत, शिवाजी वाडेकर, संजय नाईक, पिंटू लाड, सुभाष चौगुले, सागर माळी, कुमार पाटील यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.