लाखो भाविकांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : पौर्णिमा निर्दोष असते. तसे आपले मन निर्दोष असावे. सद्गुरुस्वरूप दैवत मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त स्वरूपात अवत्तीर्ण झाले. जगात भाषा, जातीच्या द्वारे भेदाने कलह माजला आहे. माणसाला अभेद ज्ञानाकडे वळविण्यासाठी हा उत्सव आहे. जगातील भेद संपविण्यासाठी परमाब्धी ग्रंथ अभ्यासणे व आचरणात आणणे आवश्यक आहे. माणसाचे प्रत्येकाचे आपापले नेटवर्क असते. त्या नेटवर्क मध्ये परमाब्धी विचार पोचवायला पाहिजेत त्यामुळे सर्वांचे हित होईल. अभेद ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते संजीवनीगिरीवर दत्त जन्म सोहळ्यातील प्रवचनात बोलत होते. दिगंबरा! दिगंबराच्या जयघोषात आडी (ता.निपाणी) येथील संजीवनगिरीवरील दत्त देवस्थान मठाच्या वतीने दत्त जन्मोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी सायंकाळी पाच वाजून दोन मिनिटांनी परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते प्रतीकात्मक श्रीदत्तगुरूंना पाळण्यात ठेवून गुलाल, फुले यांची उधळण करण्यात आली. श्री गुरुदेव दत्त असा एकच जयघोष करून जन्मोत्सव संपन्न झाला. यावेळी फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाविकांनी गुलाल फुलांची उधळण केली. यावेळी चांदीच्या पाळण्याला फुलांनी सजविण्यात आले होते. उत्सव मंडप रंगीत फुगे, फुले फुलमाळांनी सजविण्यात आले होते. सुंठवडा वाटप करण्यात आला. यावेळी पाळणा गायन तेजस्विनी सुतार, गोरंबे, भारती मोरे व सहकारी यांनी केले. यावेळी डोंगर पायथ्याशी सर्वेज्य सांस्कृतिक भवनाजवळ स्क्रीन बसवून डोंगरावर मंदिराच्या आवारात होत असलेल्या दत्त जयंती सोहळ्याचे थेट प्रक्षेपण खाली असणाऱ्या भाविकांना पाहायला मिळाल्याने आनंद व्यक्त होत होता. डोंगर पायथ्याशी असलेल्या लाखो भाविकांनीही दिगंबरा! दिगंबरा! श्रीपाद वल्लभ दिगंबरा! असा नाम जप आणि श्री गुरुदेव दत्तचा एकच घोष सुद्धा केला.
जन्मोत्सव सोहळ्यानंतर परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या दर्शनाची व्यवस्था डोंगर पायथ्यालाच करण्यात आली होती. भाविक मोठ्या श्रद्धेने भक्तीने रांगेत राहून प.पू.परमात्माराज महाराजांचे दर्शन घेत होते. दर्शन सुप्राद्य वल्भालयाच्या समोर प्रशस्त अशा जागेत महाप्रसाद वितरण करण्यात आले. स्त्री पुरुष आबालवृद्ध अशा लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सकाळपासूनच मंदिरामध्ये श्री गुरुदत्तात्रेयांच्या दर्शनासाठी व सद्गुरू परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. 18 डिसेंबरपासून 26 डिसेंबर अखेर सुरू असलेल्या परमाब्धिविचार महोत्सवात सद्गुरू परमात्मराज महाराजांचे परमाब्धी ग्रंथाविषयीचे विस्तृत विवेचन भाविकांना ऐकण्याची सुवर्णसंधी मिळाली. प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही विविध संप्रदायाचे साधुसंत देशभरातून उपस्थित होते.
यावेळी बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, ‘ब्रह्मदेव, विष्णू व शिव’ या तीनही रूपांच्या संयुक्त स्वरूपात दत्तात्रेयरूपाचा सुदिव्य आविर्भाव झाला. सांप्रदायिक वाङ्मयामध्ये नंतरच्या काळामध्ये भेद घुसळला आहे. सर्व धर्मांमध्ये, सर्व संप्रदायांमध्ये जे चांगले छान सुंदर असे विचार आहेत त्या विचारांचा सार परमाब्धिमध्ये आहे. वेद वाङ्मयातील शब्दांचे वेग वेगळे अर्थ विचारात घेतल्याने भेद निर्माण झाले आहेत. हजारो वाङ्मय वाचण्याची गरज नाही. परमाब्धी वाचा. आधुनिक विज्ञानाचा साकल्याने आधार घेऊन परमाब्धी मध्ये अध्यात्माचे विश्लेषण केले आहे.
श्रीदत्त जन्मसोहळ्याच्या वेळी श्री देवीदास महाराज, इस्कॉनचे हरि चैतन्य महाराज वृंदावन (यू.पी.), काका महाराज संभाजीनगर आदी साधुसंत तसेच लक्ष्मणराव चिंगळे, पंकज पाटील, प्रसन्नकुमार गुजर, अजित पाटील, इस्रोचे शास्त्रज्ञ केरबा लोहार, श्रीराम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, चिदानंद महाराज, अमोल महाराज, मारुती महाराज, समाधान महाराज, श्रीधर महाराज व आश्रमस्थ विद्यार्थी व वीणावादक उपस्थित होते.