प्रा. युवराज पाटील; दोशी विद्यालयात पारितोषिक वितरण
निपाणी (वार्ता) : आजच्या तरुणांनी केवळ दीड जीबी डेटा संपवणे हे आपले ध्येय न ठेवता, उच्च ध्येय ठेवून कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या स्वप्नांवर ठाम रहावे. स्वप्न पूर्ण करताना परिस्थिती नव्हे तर मनस्थिती आड येते. जसे बुद्धिबळाच्या प्याद्यामध्ये वजीर होण्याची ताकद असते, तसेच तुमच्यामध्ये देखील यशस्वी होण्याची ताकद आहे. सुरक्षितपणे वाटचाल केल्यास तुमच्या आयुष्यातले वजीर व्हाल. जेवढ्या क्षमतांचा वापर करता तेवढेच यश मिळते. ठाम राहून कृती करा. त्यामुळे आई बाबांच्या माना उंचावतील, असे मत व्याख्याते प्रा. युवराज पाटील यांनी व्यक्त केले.
अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. युवराज पाटील बोलत होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांनी शाळेने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला.
आर. एस. भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी शिक्षक प्रतिनिधी आर. आर. कपले, प्रा. युवराज पाटील, सावरी पवार, सुयोधन घाटगे, शर्वरी पाटील, शौर्य पाटील यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
एस. एस. सांडगे यांनी सूत्रसंचालन केले. आर. डी. देसाई यांनी आभार मानले.