निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील प्रभाग क्रमांक १९ मधील संभाजीनगर आणि प्रभाग क्रमांक २० मधील शिंदे नगरमध्ये ४ हजार लोकसंख्या आहे. पण या दोन्ही नगरामध्ये सार्वजनिक शौचालये रस्ते अंगणवाडी अभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत नगरपालिकेला वारंवार कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून आपण या दोन्ही नगरामध्ये भेट देऊन येथील समस्या सोडवाव्यात, अशा मागणीचे निवेदन पंकज गाडीवड्डर व नागरिकांच्या हस्ते पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना सोमवारी (ता.८) देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, वरील दोन्ही नगरामध्ये वीस वर्षांपूर्वी करण्यात आलेले रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. याशिवाय सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे महिलांची मोठी अडचण होत आहे. लहान मुलांना अंगणवाडी नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. गटारींची दुरावस्था झाल्याने रोगराई पसरत आहे. याशिवाय विविध समस्या या प्रभागातील नागरिकांना भेडसावत आहेत. तरी पालकमंत्री याची दखल घेऊन तात्काळ संभाजीनगर व शिंदे नगरात मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर गोपीचंद पोळ, अजित भाट अजित बक्कनावर, युसुफ पटेल, शाश्वत कोळी, शुभम बगाडे, सौरभ अंकुश, वैभव भाट, चन्नाप्पा कलगुटगी, मंगल घोरपडे यांच्यासह नागरिकांची नावे आहेत.