
शेतकरी बचाव कृती संघर्ष समिती; ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. यमगरणी जवळील वेदगंगा नदी पूल ते मांगूर फाटा पर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यावेळी या परिसरात भराव घातला जाणार आहे. त्यामुळे परिसरासह महाराष्ट्रातील अनेक गावासह शेतींना पुराच्या पाण्याचा धोका होणार आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाजवळ भराव न टाकता पिलर उभे करण्याची मागणी कर्नाटक महाराष्ट्रातील वेदगंगा काठावरील शेतकरी बचाव कृती समितीने नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केले आहे. याबाबतचे निवेदन कागल येथील भेटीत देण्यात आले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत समरजीत घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
निवेदनातील माहिती अशी, कर्नाटक -महाराष्ट्र सीमाभागात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधांची कामे चालू आहेत. या उच्च प्राधान्य प्रकल्पांमुळे सर्वांगीण विकास निश्चितच वेगाने होईल. पुणे बंगळुरू महामार्गावर नव्याने सुरू असलेल्या सहा पदरी रुंदीकरणाच्या कामात वेदगंगा नदीजवळील मांगूर फाटा येथे मोठ्या प्रमाणात भराव टाकून रस्त्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात नदीकाठच्या कुर्ली, चिखली, कौलगे, बस्तवडे, आणूर, म्हाकवे, मळगे खु, मळगे बु, सुरुपली, बानगे, सोनगे, कुरुकली, सुरुपली, यमगे, शिंदेवाडी, मुरगूड, भडगाव या गावांना मोठा फटका बसणार आहे. या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे बंधारे बांधल्यामुळे हजारो एकर शेती आणि हजारो कुटुंबांना दर पावसाळ्यात स्थलांतर करावे लागणार आहे. यावर उपाय म्हणून या भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी वेदगंगा नदीपात्रापासून सुमारे साडेचारशे मीटर अंतरावर उड्डाणपूल बांधावा, अशी विनंती केली आहे. तरी याबाबत तातडीने कार्यवाही करून संबंधित विभागाला निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर शिवाजी पाटील, कृष्णात पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत सावंत, काकासाहेब सावडकर, प्रवीण पाटील, दिलीप पाटील, दिलीप चौगुले, युवराज पाटील, पांडुरंग अडसुळे, आनंदा पाटील, धनाजी पाटील, अण्णासाहेब इंदलकर, चेतन पाटील यांच्यासह कर्नाटक -महाराष्ट्र सीमाभागातील वेदगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांची नावे आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta