कोगनोळी (वार्ता) : हंचिनाळ ते कोगनोळी पाच किलोमीटर रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरून वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. रस्त्याचे मजबूतपणे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी निवेदनाद्वारे मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे.
हंचिनाळ ते कोगनोळी हा रस्ता मागील कित्येक महिन्यांपासून खराब झाला असून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. या रस्त्यावरून वाहने घसरून आत्तापर्यंत दुचाकी व चारचाकीचे अपघात झालेले आहेत.
रस्ता अक्कोळ, जत्राट, आडी, बेनाडी, शिवापूरवाडी, गजबरवाडी, कुन्नूर या सर्व गावांना कागल शहराला व महाराष्ट्र राज्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी कागल कोगनोळी येथे ये-जा करीत असतात. त्यामुळे सदर रस्त्याची त्वरित मजबूतपणे रुंदीकरणासह डांबरीकरण करून देण्याची लेखी निवेदन मंत्री शशिकला जोल्ले यांना हंचिनाळ ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य एम. वाय. हवालदार, आर. एल. चौगुले, विकास नलवडे, केशव पाटील, कृष्णात कानडे, सुरेश पाटील, शिवानंद कनवाडे, वैभव जाधव, रोहित भोसले, विजय माळी यांच्यासह युवक, ग्रामस्थ उपस्थित होते.
