तहसीलदारांना निवेदन; नेते मंडळींचा पाठिंबा
निपाणी (वार्ता) : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा मूलभूत अधिकार प्रदान केला आहे. त्या अधिकाराचा वापर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी केला पाहिजे. त्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणे आवश्यक आहे. सध्या ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केले जाते. परंतु इलेक्ट्रॉनिक मशीनबाबत शंका उपस्थित होते. यासाठी निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन ऐवजी येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या काळात निवडणुकांसाठी (बॅलेट पेपरवर) मतपत्रिकाद्वारे मतदान प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करीत येथील तहसील कार्यालयावर सर्वसमावेशक नागरिकांच्यावतीने गुरुवारी (ता.२५) मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाला अक्कोळ रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथून सुरुवात झाली. धर्मवीर संभाजी चौक येथे काही काळ मोर्चा थांबवून घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. हा मोर्चा नगरपालिके समोर आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला.
यावेळी तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी,होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन वापरू नयेत. यासाठी ईव्हीएम हटावो, देश बचावो, संविधान बचाव, लोकतंत्र बचाओ, असा नारा देण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांनी आपली मते व्यक्त केली. तहसीलदार बळीगार यांनी निवेदन स्वीकारून आपल्या मागणीचे निवेदन वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संविधान वाचवा, देश वाचवा, ईव्हीएम हटवा, अशा घोषणा देण्यात आल्या. या मोर्चास माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा.सुभाष जोशी, सहकारत्न उत्तम पाटील यांनी पाठिंबा दिल्याची माहिती राजकुमार मेस्त्री यांनी दिली.
मोर्चामध्ये ॲड. अविनाश कट्टी, युवा उद्योजक रोहन साळवे, प्रा. एन. डी. जत्राटकर, कबीर वराळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, अस्लम शिकलगार, प्रवीण सौंदलगे, जरारखान पठाण, जगदीश हेगडे, किरण कांबळे, अमित शिंदे, प्रवीण माने, प्रा. जे. डी. कांबळे, अविनाश माने, अमित शिंदे, अनिल श्रीखंडे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. यावेळी शहर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.