खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्लेंची उपस्थिती: मिरवणुकीवर पुष्पवृष्टी
निपाणी (वार्ता) : हिंदू बांधव व श्रीरामसेना हिंदुस्थानतर्फे रविवार (ता.४ ) सायंकाळी ५ वाजता श्रीरामनवमी भव्य शोभायात्रा काढण्यात या शोभायात्रेला नागरिकांच्या गर्दीचा उच्चांक झाला. यावेळी खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध प्रकारच्या वेशभूषा करून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. जळगाव नाकावरील श्री राम मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक शहरातील विविध मार्गावर जाऊन पुन्हा राम मंदिरा जवळ सांगता करण्यात आली.
२२ जानेवारीला अयोध्यामध्ये प्रभु श्री रामाची मूर्ती प्राण-प्रतिष्ठा आणि श्री राम मंदिर उदघाटन सोहळा पार पडला. त्यानिमीत्त ही शोभायात्रा काढण्यात आली.
जोल्ले दाम्पत्यासह मान्यवरांच्या हस्ते येथील श्री राम मंदिरात पूजा करून शोभायात्रेचे उद्घाटन झाले.
शोभायात्रेत घोडे, मर्दानी खेळ, गड संवर्धन देखावा, पाणीटंचाई आणि उपाययोजना, स्त्रीभृण हत्या यासोबत अनेक सामाजिक संदेश देखावे, महापुरुष आणि थोर महिला यांच्या वेशभूषा, प्रभु श्रीराम, श्री हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूतींचा समावेश होता.
बेळगाव नका राम मंदिर, जुना पी.बी. रोड, निपाणी मेडिकल, कित्तुर चन्नम्मा चौक, अशोकनगर, कोठीवाले कॉर्नर, दलाल पेठ, तानाजी चौक, चाटे मार्केटमार्गे ही शोभायात्रा पुन्हा राम मंदिर जवळ नेण्यात आली. यावेळी आजी-माजी नगराध्यक्ष नगरसेवक, कार्यकर्ते आणि राम भक्त सहभागी झाले होते. शोभायात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली शहर ग्रामीण आणि बसवेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व कर्मचारी कार्यात होते.
——————————————————————मिरवणूक निघण्यापूर्वी नगरपालिका प्रशासना तर्फे शहरातील निवडणुकीच्या मार्गावर पाणी मारण्यात आले होते. तर मिरवणूक मार्गावर नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या रेखाटून मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली.
——————————————————————-
‘जय श्रीराम’च्या घोषणा
शोभा यात्रेमध्ये श्रीराम भक्तांनी जय श्रीराम चा घोषणा देऊन मिरवणुकीचा मार्ग दणाणून सोडला होता. शिवाय सर्वच मार्गावर भगवे ध्वज आणि पताका लावल्या होत्या. त्यामुळे सोमवारची सायंकाळ श्रीरामय झाली होती.
——————————————————————–
टाळ -मृदुंगाचा गजर
शोभा यात्रेमध्ये वारकरी संप्रदायाची मंडळी सहभागी झाली होती. त्यामुळे शोभायात्रेमध्ये टाळ मृदंगाचा गजर प्रामुख्याने दिसत होता.
——————————————————————-
मिरवणुकीच्या मार्गावर सरबतसह पाणी
शोभा यात्रेच्या मिरवणुकीच्या मार्गावर अनेक राम भक्तांनी कार्यकर्त्यांसाठी सरबतसह पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.