
गरिबाच्या ताटातील भाकरी महागली ; अत्यल्प उत्पादनाचा फटका
निपाणी (वार्ता) : पूर्वी गरिबांचा आहार असलेली ज्वारी आता महागली असून ती चक्क गरिबांच्या ताटातून गायबच होऊ लागली आहे. सद्या किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीची ज्वारी ६० ते ७० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा हा फटका बसत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गेल्या वर्षीं पावसाची अनियमितता, अतिवृष्टी व इतर कारणाने उतारा कमी झाल्याने उत्पादन घटले. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकासह सर्वत्रच ज्वारी कमी झाली. परिणामी दरामध्ये वाढ झाली. यंदा प्रथमच मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून ज्वारीची आवक झाली आहे. काही वर्षांपूर्वी ज्वारी हे गरिबांचे धान्य समजले जात असे. गहू फक्त सणासुदीला त्यांच्या ताटात दिसत असे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. भाकरी पचनास हलकी असल्याने आता श्रीमंतीचे प्रतीक झाले आहे. त्यामुळे गव्हापेक्षाही ज्वारीचे भाव वाढले आहेत.
सध्या ज्वारीला चांगला दर मिळत असला तरी नगदी पीक म्हणून ऊस उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने पेरली जाणारी ज्वारी आता केवळ पीक राहावे, या उद्देशाने पेरली जात आहे. मात्र दुसरीकडे स्थूलपणा कमी करण्यासाठी ज्वारीच्या भाकरीचा आग्रह वाढत आहे. त्यामुळे ज्वारीची मागणी वाढली आहे. महाराष्ट्रतून ज्वारी येत होती, तेथेही ती आता पुरेशा प्रमाणात मिळत नाही. ज्वारी महागल्याने गरिबांना महागाईचे चटके जाणवू लागले आहेत. यंदाच्या हंगामातील ज्वारी येईपर्यंत दर चढेच राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे
——————————————————————
यंदा पेरणी क्षेत्रात घट
रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी केली जात होती. पण पेरणीच्या काळात पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणीकडे दुर्लक्ष केले. त्याशिवाय गहू हरभरा या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta