
प्रा. वसंत हंकारे : यश प्लस अकॅडेमीचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : कोणताही बाप आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, याची काळजी घेतो. स्वतः हलाखीचे जीवन जगत पाल्यांसाठी आयुष्यभर कष्ट करणाऱ्या बापाला आपल्यामुळे कुठेही खाली बघायची वेळ येणार नाही. याची खबरदारी घेत स्वाभिमानाने जगा, असे मत प्रेरणादायी वक्ते प्रा. वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.
ते कागल येथील यश प्लस अकॅडमी यांच्यातर्फे कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी सदस्य अरुण निकाडे होते.
हंकारे म्हणाले, आपल्या जीवनात अपयश आले तरी आपले आई-वडील आपल्याला आधार देतात. २१ व्या शतकात चारित्र्यवान माणसे घडवायची आहेत. आपण प्रगती केली असली तरी वृद्धाश्रमात आई-वडिलांची संख्या वाढत आहे. अवघे जग तंत्रज्ञानाने मुठीत घेतले आहे. मात्र आयुष्यभर मुला बाळांची काळजी घेणाऱ्या आई-वडिलांना मचले विसरत चालली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले.
मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रा. अमर पाटील व लक्ष्मीकांत पाटील यांनी यश प्लस अकॅडमीच्या उपक्रमांची माहिती दिली. गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास जे. एस. वाडकर, अरविंद कांबळे, अंजली अमृतसमन्नावर, विनायक गुरव, एस. एस. मगदूम, रघुनाथ चौगुले, के. डी. पाटील, शिवाजी चौगुले, कुमार माळी, सीताराम चौगुले, अभिजित निकाडे, नामदेव निकाडे, डी. टी. कांबळे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. टी. एम. यादव यांनी सूत्रसंचालन तर ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta