लेखन कुणाचे, उचलेगिरी कुणाची : लगाम घालणार कोण
निपाणी (वार्ता) : बदलत्या काळात डिजिटल तंत्रज्ञान आले आहे. सोशल मीडिया व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामने सारेच बदलले आहे. अशा बदलाचा मोठा परिणाम साहित्य क्षेत्रावर होत आहे.
निपाणी शहर आणि परिसरात साहित्याची उचलेगिरी, वाङ्मय चौर्य प्रकार सर्रास दिसून येत आहेत. क्षणिक प्रसिद्धीच्या हव्यासात दर्जेदार आणि अस्सल साहित्य दुरापास्त होत आहे. सोशल मीडियावरील पोस्ट, पीडीएफ लाइक, शेअर, कॉमेंटने खरे पुस्तकाचे विश्व हरवत चालले असल्याच्या प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रातील मान्यवर मधून व्यक्त होत आहेत. वाङ्मय चौर्य तसे श्रेयचौर्य या दोन संकल्पना आहेत. दोन्हींच्या मुळाशी चोरी ही समाज संकल्पना आहे. नामवंत लेखक होण्या साठी कुठल्या साहित्याची निर्मिती करायची नाही की कोणते नवे साहित्य उपलब्ध करून द्यायचे नाही. स्वतःला विद्वान समजणारे लोक समाजात वाढत आहेत. अलीकडच्या काळात विद्यापीठीय स्तरापासून महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, मार्गदर्शक डिजिटल काळात नवी उचलेगिरी करून साहित्यात असो की संशोधनात असो नवे प्रथितयश लेखक, विचारवंत म्हणून मिरवत आहेत. हे समाजाच्या दृष्टीने खेदाची बाब आहे.
आधुनिक काळात अंतरजाल व्यवस्थेची वाढती प्रगती यामुळे अनेक क्षेत्रात बदल झाले आहेत. डिजिटल युगात साहित्यक्षेत्रातही बदल झाले आहेत. साहित्यक्षेत्र हा आपला सांस्कृतिक अनमोल ठेवा आहे. ती लेखकाची संपत्ती आहे. अनेक लेखकांनी अजरामर साहित्य लेखन केलेले आहे. सोशल मिडियाच्या आडून वाङ्मय चौर्य वाढते आहे ही चिंतेची बाब आहे. साहित्य ही लेखकाच्या प्रतिभेची स्वनिर्मिती असते. सवंग प्रसिध्दीसाठी अनेक सटरफटर लेखक म्हणवून घेणारे वाङ्मय चौर्य करून झटपट प्रसिध्दी मिळवित आहेत.
—-
उचलेगिरी साहित्याला मारक
तंत्रज्ञानाने युग बदलले तरी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सोशल मीडियावर नेमके विचार कुणाचे हाच प्रश्न पडतो, एवढा ’कट-पेस्ट’ साहित्याचा भडिमार सुरु आहे. व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर माध्यमांनी पुस्तक वाचनाची गोडी हरवली आहे. कविता मोठ्या प्रमाणावर चोरीला जात आहे. प्रथितयश कवीच्या कविता इतर कुणीतरी आपल्या नावासह पोस्ट पाठवितो, ही उचलेगिरी अस्सल साहित्याला मारक आहे.
—
’सोशल मीडियावर कथा, कविता आणि गझल प्रकारात मोठ्या प्रमाणावर वाङ्मयीन चौर्य घडत आहे. साहित्याचे विविध समूह आहेत. एक कविता व्हायरल झाली की, तिची हुबेहुब शब्द बदल करीत जशीच्या तशी कविता येते. अशा प्रकाराला कसा आणि कोण लगाम घालणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर याला निर्बंध घालता आला पाहिजे.’
-प्रा. नानासाहेब जामदार, निपाणी
Check Also
गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणारी १८ वासरे, ३४ रेडके पकडली
Spread the love कागल पोलिसांची कारवाई; एक ताब्यात निपाणी : कत्तलीसाठी चार दिवस व एक …