Saturday , June 15 2024
Breaking News

सेवा रस्ते बनले डंपिंग ग्राउंड!

Spread the love

रात्रीच्या वेळी कचर्‍याची विल्हेवाट : घंटागाडीकडे दुर्लक्ष
निपाणी (वार्ता): शहर आणि उपनगरातील कचरा उठाव करण्यासाठी नगरपालिकातर्फे घंटागाड्या सुरू केल्या आहेत. पण बर्‍याच ठिकाणी घंटागाड्या जात नसल्याने नागरिकांसह, व्यावसायिक सेवा रस्त्याकडेलाच कचरा टाकत आहेत. त्यामुळे महामार्गाच्या शेजारील सेवा रस्ते डंपिंग ग्राउंड बनत असल्याचे चित्र निपाणी परिसरात दिसत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
शहरातील नागरिकांसह व्यावसायिकांचा कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेतर्फे दररोज घंटागाडी सोडण्यात येत होती. पण गेल्या दोन महिन्यापासून त्यामध्ये विस्कळीतपणा आल्याने नागरिकांना कचर्‍याच्या विल्हेवाटीची चिंता लागून राहिली आहे. व्यावसायिकांचा कचरा जास्त असल्याने दोन दिवसातून एकदा वाहनातून हा कचरा शहराबाहेरील सेवा रस्त्याच्या कडेला टाकला जात आहे. तसेच हॉटेल व इतर व्यवसायातील कचराही येथेच टाकला जात असल्याने पहाटे आणि सायंकाळी फिरायला जाणार्‍या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शिवाय या कचर्‍यामध्ये मोकाट कुत्री व डुकरांचा वावर वाढल्याने नागरिकातून भीती व्यक्त होत आहे.
शहराबाहेरील प्रतिभानगराच्या शेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर पुलाखाली कचरा टाकला आहे. बेळगाव नाक्यावरील उड्डाण पुलाच्याशेजारी प्लास्टिकसह अन्य कचरा टाकला जात आहे. बर्‍याचदा हा कचरा जाळला जात असल्याने प्रदूषणही होत आहे. त्यामुळे व्यावसायिक, कचरा टाकणार्‍या नागरिकांकडे नगरपालिकेने लक्ष देऊन रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा बंद करण्याची मागणी होत आहे.

नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
शहरातील काही मटन आणि चिकन दुकानातील टाकाऊ कचरा, मांसाचे तुकडे, कोंबड्यांची पिसे सेवा रस्त्याकडेला फेकून दिली जात आहेत. त्यामुळे परिसर दुर्गंधीयुक्त बनत चालला आहे. शिवाय काही वैद्यकीय मंडळी वैद्यकीय कचरा ही रस्त्याकडेला फेकून देत आहेत. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
——
’काही तांत्रिक अडचणीमुळे घंटागाडी येण्यास विलंब झाला. तरीही नागरिकांनी परस्पर कचर्‍याची विल्हेवाट लावू नये. यापुढील काळात शहरासह उपनगरात घंटागाड्या वेळेवर जाण्यासाठी नियोजन केले जाईल.’
– स्वानंद तोडकर, अभियंते, निपाणी नगरपालिका

About Belgaum Varta

Check Also

जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान नुकसान झाले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *