सुधाकर माने यांची माहिती; दोन सत्रात होणार कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथे रविवारी (ता.२५) अकोळ रोड वरील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवन समोर दोन सत्रात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुधाकर माने यांनी दिली.
माने म्हणाले, धम्म परिषदेच्या पहिल्या सत्रामध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत धम्म परिषदेच्या पहिल्या सत्रामध्ये धम्म ध्वजारोहण व त्यानंतर भंते यश संबोधी थेरो, कोल्हापूर व भंते आर. आनंद थेरो, कोल्हापूर, भंते नागसेन बोधी, इचलकरंजी यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेला सुरुवात होणार आहे. या परिषदेचे उदघाटन चंद्रकांत सांगलीकर- गुगवाड, (सांगली) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी धम्मदेशना या विषयावर प्रा. डॉ.अच्युत माने, प्रा. जे. डी. कांबळे हे मार्गदर्शन करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात दुपारी २ ते ६ या वेळेत प्रबोधनात्मक भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अमित मेधावी (कोल्हापूर) हे उपस्थित राहणार असून ते ‘धम्म समजून घेताना’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दलित क्रांती सेनेचे अध्यक्ष अशोककुमार असोदे, नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेजी, ॲड. महेंद्र मंकाळे, मल्लेश चौगुले, डॉ. विक्रम शिंगाडे, अरविंद घट्टी हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी धम्म कार्याकरिता बौद्ध उपासक कपिल कांबळे यांना दुचाकी प्रदान करण्यात येणार आहे. तरी बौद्ध उपासक, उपासिकांनी या परिषदेत उपस्थित राहावे, असे आवाहन माने यांनी केले आहे.