कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळ असणाऱ्या दूधगंगा नदीवरील विद्युत मोटरी चोरी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 1 रोजी उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्ग लगत असणाऱ्या दूधगंगा नदीवर कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, वंदुर, करनूर येथील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरी आहेत. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी वारंवार विद्युत मोटरीची चोरी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दूधगंगा जुन्या पुला नजीक असणाऱ्या रावसाहेब पाटील-म्हाकवे यांची 5 एचपी ची मोटर अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. मागील दोन महिन्यापूर्वी महामार्गावर असलेल्या पुलाच्या पश्चिमेकडील बाजूच्या सात विद्युत मोटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे असताना वारंवार विद्युत मोटारींची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांना करायचे तरी काय असा प्रश्न पडला आहे. विद्युत मोटरी चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना देऊन देखील अज्ञात चोरट्यांचा सुगावा लागत नाही. यामुळे या अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त कसा करायचा यासाठी शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.