माजी आमदार काकासाहेब पाटील : मराठा मंडळ भवनात कार्यकर्त्यांची बैठक
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील जनतेला पाच गॅरंटी योजना दिल्या होत्या. सत्तेत आल्यानंतर अवघ्या एक वर्षाच्या आतच या पाचही गॅरंटी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. निपाणी तालुक्यातील हजारो कुटुंबांना याचा लाभ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार १२ रोजी निपाणीत गॅरंटी योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत होणार आहे. येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात सकाळी १० वाजता होणाऱ्या या मेळाव्यास तालुक्यातील कार्यकर्ते व लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले.
गॅरंटी योजना लाभार्थी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची नियोजन बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील यांनी स्वागत केले. माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिलेल्या गॅरंटी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यामुळे जनतेने या योजनांचा लाभ घेण्याबरोबरच काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे राहावे, असे आवाहन केले.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे म्हणाले, निपाणी तालुक्यात ६० हजार महिलांना प्रति महिना दोन हजार रुपये मिळत आहेत. ६८ हजारावर कुटुंबांना मोफत प्रतिव्यक्ती दहा किलो तांदूळ मिळत आहेत. १३ हजार कुटुंबांना मोफत विजेचा लाभ मिळत आहे. निपाणी आगारातून महिन्याला ३ लाख महिला शक्ती योजनेतून मोफत बस प्रवासाचा लाभ घेत आहेत. युवा निधीचाही बेरोजगार युवकांना लाभ होत आहे. काँग्रेस सरकारने जाती धर्मापलीकडे जाऊन जनतेला या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या योजनांचा तळागाळात प्रचार करण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, अण्णासाहेब हावले, राजेंद्र वड्डर, सुमित्रा उगळे, दिपाली श्रीखंडे, शामराव पुंडे, संजय कांबळे, जरारखान पठाण यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस युवा नेते रोहन साळवे, सुजय पाटील, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, शंकरदादा पाटील, लक्ष्मण हिंदलकर, निकु पाटील, शासननियुक्त नगरसेवक ॲड. एस. एस. चव्हाण, अरुण आवळेकर, रवी श्रीखंडे, फारुख गवंडी, लक्ष्मी बल्लारी, युवराज पोळ, अशोक लाखे, विश्वास पाटील, किरण कोकरे, नवनाथ चव्हाण, किरण पाटोळे, महिला काँग्रेस अध्यक्षा वर्षा चव्हाण, माजी नगराध्यक्षा जयश्री लाखे, स्वाती दबडे, रेखा कांबळे, वैजयंती बुद्धाचार्य यांच्यासह कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. श्रीनिवास संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले.