
निपाणीत राष्ट्रीय लोकअदालत; अनेक प्रकरणे निकाली
निपाणी (वार्ता) : येथील अक्कोळ रोडवरील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत झाली. त्यामध्ये वकिलांनी समुपदेशन करून घटस्फोटीत व घरगुती भांडणातून विभक्त झालेल्या ५ जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्रांची पूर्तता करून या जोडप्यांचा पुनर्विवाह लावण्यात आला.
वरीष्ठस्तर न्यायाधीश प्रेमा पवार यांनी ५ घटस्फोटीत जोडप्यांचा दावा यशस्वीपणे हाताळून संबंधित जोडप्यांचे समुपदेशन केले. त्यानुसार ही जोडपी पुन्हा विवाह बंधनात अडकली.
लोक अदालतीत दाखलपूर्व १३ हजार ५१६ तक्रारी पैकी १३ हजार ४१६ प्रकरणे निकाली काढली. एकूण १५५१ दावे दाखल झाले होते. त्यातील १०८४ दावे निकालात काढले. त्यातून
२ कोटी १७ लाख ६ हजार २३२ रकमेची तडजोड करण्यात आली. जोडप्यांना रेशीम गाठीमध्ये बांधण्यासाठी वरिष्ठ न्यायाधीश प्रेमा पवार, न्यायाधीश सुनीता प्रभन्नावर, कनिष्ठ प्रभारी न्यायाधीश नागज्योती एम. एल यांनी काम पाहिले.
पक्षकारा तर्फे विवाह बंधनात जोडप्यांना एकत्र आणण्यासाठी ॲड. सुषमा बेंद्रे, ॲड. एम. आर. फल्ले, ॲड. पी. बी. बेडकीहाळे, ॲड एम. ए. सनदी, ॲड. के. डी. चौगुले यांनी काम पाहिले. यावेळी वकील संघटना अध्यक्ष ॲड. आर. एम. संकपाळ, उपाध्यक्ष ॲड. एन. एम. वराळे, सचिव ॲड. बी. आर. औरनाळे, सहायक सचिव व्ही. व्ही. श्रीपन्नावर यांच्यासह वकील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta