सहकाररत्न उत्तम पाटील : राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा
निपाणी (वार्ता) : राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया आघाडीतील घटक आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून प्रचाराची धुरा राबविण्यात येणार आहे. तसेच निपाणीसह सातही मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना मताधिक्य देण्यात येणार असल्याचे सहकाररत्न उत्तम पाटील यांनी सांगितले. येथील राष्ट्रवादी कार्यालयात रविवारी (ता.१४) आयोजित नेते मंडळ व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, यापूर्वी कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या भावना जाणून घेतले आहेत. कार्यकर्ता हाच आपला पक्ष असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी ऑफर देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. राज्यात काँग्रेसची सत्ता असल्याने पालकमंत्री सतीश जारकीहोळी त्यांनी सर्वसामान्य शासकीय कामात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीतर्फे स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे. अखेरच्या टप्प्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रचारसभा घेणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, अशोककुमार असोदे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी स्वागत केले. गोपाळ नाईक यांनी आभार मानले.
बैठकीस नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, शौकत मनेर, दीपक सावंत, संजय पावले, दिलीप पठाडे, शेरू बडेघर, राजू पाटील-अक्कोळ, निरंजन पाटील -सरकार, गजानन कावडकर, शिरीष कमते, इम्रान मकानदार, चेतन स्वामी, विष्णू कडाकणे, सुरज राठोड, राजू फिरगनावर, इंद्रजीत सोळांकुरे, अरुण निकाडे यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.