केपीसीसी प्रवक्ते मुनीर : बुथ प्रतिनिधींना प्रशिक्षण
निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघात २४८ बुथ आहेत. प्रत्येक बुथवर काँग्रेसला मताधिक्य मिळेल, यासाठी बुथ प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन करावे. पक्षांव्यतिरिक्त जे सामान्य मतदार आहेत, त्या मतदारांपर्यंत काँग्रेस सरकारच्या योजना आणि भाजप सरकारचे अपयश याबाबत जागृती करावी, अशा सूचना कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते ए. मुनीर यांनी केल्या.
येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात निपाणी मतदारसंघातील बुथ प्रतिनिधींना निवडणूक प्रचार यंत्रणेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम होते.
मुनीर म्हणाले, लोकसभा कार्यक्षेत्राचा विचार करता प्रचारासाठी कमी वेळ मिळणार आहे. अशावेळी बुथ प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी गॅरंटी योजनांची यशस्वीपणे झालेली अंमलबजावणी तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसने दिलेल्या योजनांचेही महत्व मतदारांना पटवून द्यावे. मतभेद असतील तर ते सर्व मिटवून पक्षासाठी एकदिलाने काम करावे, असे आवाहन केले.
यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, केपीसीसी प्रवक्ते सुधाकर बडीगेर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, युवा उद्योजक रोहन साळवे, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, सुजय पाटील, प्रतिक शहा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व बुथ प्रतिनिधी उपस्थित होते.