जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचा विश्वास
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे.चिकोडी लोकसभा मतदारसंघात ५ लाख ६८ हजार महिलांना ९ महिन्यांपासून दर महिन्याला २००० रुपये दिले जात आहेत. १ लाख ५० हजार कुटुंबांचे वीज बिल माफ झाले आहे. ७ लाखांवर कुटुंबांना मोफत धान्य व रक्कम देण्यात येत आहे. राज्यात ३५ लाखांवर महिला दररोज मोफत प्रवास केला आहे. त्यामुळे प्रत्येकाने काँग्रेसलाच मतदान करण्याचा निर्धार केला असून त्या जोरावर प्रियांका जारकीहोळी या मतदारसंघात आजतागायत झालेल्या मतदानापैकी विक्रमी मताधिक्य घेऊन विजयी होतील, असा विश्वास जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी व्यक्त केला.
चिंगळे म्हणाले, चिकोडी लोकसभा मतदारसंघातील ८ विधानसभा मतदारसंघात ५१६ गावे, ९ नगरपरिषदा ९ नगरपंचायती व एका नगरपालिकेचा समावेश आहे. एकूण १७ लाख ६८ हजार मतदान आहे. मतदारसंघात पालकमंत्री सतीश जारकीहोळी, राज्य सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार राजू कागे, गणेश हुक्केरी, महेंद्र तमन्नावर, माजी मंत्री वीरकुमार पाटील, ए. बी. पाटील, शशिकांत नाईक, माजी आमदार शाम घाटगे, काकासाहेब पाटील, मोहन शहा, प्रा.सुभाष जोशी, सहकारत्न उत्तम पाटील, महावीर मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, विविध घटकांचे पदाधिकारी कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घर पिंजून काढले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने सर्व गॅरेंटी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली असल्याने जनतेचा काँग्रेसवरील विश्वास वाढला आहे. प्रत्येक कुटुंबाला गॅरंटी योजनेमुळे दर महिन्याला साडेचार ते पाच हजार रुपये मिळत आहेत. मतदारांनी क्षणिक अमिषाला बळी न पडता कायमस्वरूपी काँग्रेसच्या योजनांचा लाभ घेत असल्याने काँग्रेसला मतदान करण्याचे ठरवले आहे. त्या जोरावर जारकीहोळी यांचा मोठ्या मताधिक्यानी विजय होणार असल्याचे चिंगळे यांनी सांगितले.