निपाणी (वार्ता) : गोकाक येथील तालुका पंचायतीचे अधिकारी शेतकऱ्यांना चांगली वागणूक देत नाहीत. त्याशिवाय कलारकोप्प येथील रायाप्पा गौडपन्नावर यांच्या शेतीत ग्रामविकास अधिकारी आणि तालुका पंचायतीमधील अधिकाऱ्यांच्या संगणमताने घर बांधण्यात आले आहे. शिवाय सदरचे घर दुसऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यावरील अन्याय दूर करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर निवेदन सादर करण्यात आले.
राजू पोवार म्हणाले, शेतकऱ्याच्या जमिनीवर ग्रामपंचायतने घर बांधले आहे. शिवाय चार वेळा जीपीएस करण्यात आले आहे. याबाबत तालुका पंचायत आणि पोलीस ठाण्याला तक्रार करूनही केवळ चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता सदरचे घर संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर करावे. किंवा सदरचे घर पाडून शेत रिकामे करून द्यावे. अन्यथा रयत संघटनेतर्फे उग्र आंदोलन असल्याचे सांगितले. यावेळी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दर महिन्याला ग्रामसभा बोलवून शेतकऱ्यांच्या समस्या निकालात काढण्याची मागणी करण्यात आली.
संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ याबाबत चौकशी करून संबंधित शेतकऱ्याला न्याय देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
मोर्चामध्ये राज्याध्यक्ष चुन्नापा पुजारी, कुमार तिगडी, मुत्ताप्पा बगन्नावर, शिवू ईळीगेर, लखन शिंगोटी, मंजुनाथ पुजारी, गुरुनाथ हुक्केरी, वीरण्णा ससालट्टी, गोपाळ कोकणूर, रायाप्पा गौडण्णावर, पांडुरंग वधारट्टी यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.