निपाणी (वार्ता) : माणकापूर येथे गुरुवारी (ता.४) पहाटे एका व्यक्तीने यंत्रमागधारकावर चाकू हल्ला केला. सागर कुंभार असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मनोहर कोरवी असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. जखमी कुंभार यांना चिक्कोडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
संशयिताने यापूर्वी माणकापूर ग्रामपंचायत मधील महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती. शिवाय ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रंथालयातील पुस्तके चोरून नेणे, फाडणे असे प्रकार केले आहेत. ग्रामपंचायतमधील संगणक खुर्च्यांची मोडतोड करून लाखो रुपयाचे नुकसान केले आहे.
सागर कुंभार हे यंत्रमाग कामगार आणि गोरोबा कुंभार मंदिरचे पुजारी आहेत. त्यांच्यावर चाकू हल्ला झाल्याचे समजताच ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार व ग्रामपंचायत माजी अध्यक्षा वैशाली कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. शिवाय सागर कुंभार यांना चिक्कोडीच्या हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केले आहे.