पालकमंत्री सतीश जारकीहोळी; बोरगाव ओमगणेश टेक्स्टाईलला भेट
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारकडून मागासवर्गीय समाजासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित आहे. अल्प व्याजदरात व मोठ्या प्रमाणात सबसिडी देऊन उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्याचा दलित व मागासवर्गीय समाजातील युवकांनी लाभ घेऊन उद्योजक व्हावे, असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोरगाव येथील औद्योगिक वसाहतीत आसलेल्या भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर -पवार यांच्या ओम गणेश टेक्स्टाईल मिलला भेट देऊन यंत्रमागांची माहिती घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते.
या ठिकाणी असलेल्या आधुनिक यंत्रमागांचे सविस्तर माहिती घेऊन कोणत्या प्रकारचे कापड तयार होते, किती कामगार काम करतात, शासनाकडून किती सबसिडी मिळाली, किती कर्ज घेतले याबाबत माहिती करून घेतले. राजेंद्र वडर-पवार यांनी ओम गणेश टेक्स्टाईल मिल मध्ये दोन विभागात सुमारे ५० कामगार काम करत असल्याचे सांगितले. यावेळी ५० कामगारांच्या कुटुंबीयांचे राजेंद्र वडर यांच्याकडून पालन, पोषण होत असल्याने त्यांचे कौतुक करून बेळगाव जिल्ह्यातील मागासवर्गीय युवकांनी राजेंद्र वडर – पवार यांचा आदर्श घेऊन उद्योजक बनावे असे त्यांनी सांगितले. यंत्र विभागाच्या मुख्यालय बेंगलोरच्या कार्यालयात राजेंद्र वडर पवार यांच्या आदर्श उद्योजकाबाबत माहिती प्रकाशित केल्याने त्यांचे कौतुक केले. ओम गणेश टेक्स्टाईल मिलची पाहणी करून शासनाकडून देण्यात येणाऱ्या सवलतीचा योग्य व पुरेपूर उपयोग करून राजेंद्र वडर यांनी चांगल्या प्रकारे व्यवसाय सुरू केले आहे. शिवाय या व्यवसायातून समाजातील ५० कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याने सतीश जारकिहोळी यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ओम गणेश टेक्स्टाईल मिलच्या परिवाराकडून सतीश जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार काका पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, सहकारत्न उत्तम पाटील, अण्णासाहेब हावले, शंकर दादा पाटील, ओमकार वडर, रोहित वडर यांच्यासह ओम गणेश टेक्स्टाईल मिल मधील कर्मचारी वर्ग व बोरगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta