निपाणी (वार्ता) : सलग चार दिवस होणाऱ्या पावसामुळे पुणे- बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील मांगुर फाट्याजवळ सेवा रस्ता आणि शेतीवाडीतील पाणी आल्याने विस्कळीत झाली होती. तर शुक्रवारी (ता.२६) एकेरी वाहतूक सुरू होती. शनिवारी (ता.२७) पहाटेपासूनच पाऊस थांबण्यासह पाणी वाहून गेले. तसेच यमगर्णी येथे महामार्ग रस्ता जोडल्याने दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील मांगुर फाट्याजवळ सेवा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा आल्याने दोन दिवस एकेरी वाहतूक सुरू केली होती. महसूल आणि पोलीस प्रशासनाने चर मारून पाण्याला मार्ग काढून दिला होता. त्यानंतर शुक्रवारी (ता.२६) रात्रीपर्यंत सेवा रस्त्यावरून आलेले पाणी नदीत गेल्याने पाण्याचा उतार झाला. त्यामुळे शनिवारी सकाळी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत दुहेरी मार्गावरून वाहतूक सुरू केली आहे. केवळ मांगुर फाटा ते नदीपर्यंत एकेरी मार्ग असून त्यापुढे नव्या सहा पदरी रस्त्यावरून रस्ता जोडून पूर्वीप्रमाणे वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे दोन दिवस रांगा लागलेल्या रस्त्यावर किरकोळ वाहने दिसत आहेत. तरीही संभाव्य धोका ओळखून तहसीलदार मुजफ्फर बळीगार आणि मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसासह महसूल खात्याचे कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय रुग्णवाहिकाही सज्ज ठेवली आहे
——————————————————————
नदीकाठची पिके पाण्याखाली
मांगुर फाटा परिसरात दोन्ही बाजूला सहा पदरीकरणाच्या वेळी भराव टाकण्यासह भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरून येणारे पाणी पिकात मोठ्या प्रमाणात शिरले आहे. परिणामी उसासह इतर पिके पाण्याखाली गेली आहेत.
—————————————————————-
‘शनिवारी सकाळपासून राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूने वाहतूक सुरू केली आहे. मांगुर फाट्यावरील पाणीही कमी झाले आहे. त्यामुळे वाहनधारकासह नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.’
– बी. एस. तळवार, मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी