पूरग्रस्त छावणीला रात्रीची भेट; जाणून घेतल्या समस्या
निपाणी (वार्ता) : निपाणीचे ग्रेड- १ तहसीलदारपदी प्रवीण कारंडे यांची गुरुवारी नियुक्ती झाली. सकाळी पदभर स्वीकारताच त्यांनी प्रशासकीय कामाला प्रारंभ करून मानकापूर येथील पाटील मळ्यातील पूरग्रस्त छावणीला रात्रीची भेट दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. तर गैरहजर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी रात्रीच्या वेळी भेट देऊन पूरग्रस्तांची चौकशी करताच छावणीत वास्तवात असलेल्या पूरग्रस्तांनी त्यांचे आभार मानले. तर रात्रीच्या वेळी तहसीलदारांनी भेट देऊन काळजी घेतल्याचे आपण पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगितले.
पूरग्रस्तांच्या छावणीत गैरहजर
असलेल्या नोडल अधिकारी, महसूल, ग्रामपंचायत, आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिवाय तात्काळ पूरग्रस्त छावणीमध्ये हजर राहण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन पीक नुकसानीबाबतही योग्य सर्व्हे करण्याची ग्वाही दिली. ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील म्हाकाळे यांनी, प्रत्येक वर्षी पाटील मळा येथे पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पूरग्रस्तांचे पुनर्वसन केल्यास त्यांना अधिक मदत होईल. त्या पार्श्वभूमीवर आपण शासन दरबारी प्रयत्न करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली.यावेळी महसूल निरीक्षक रवीकुमार मजली, ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगुले, अवी तेरदाळे, राकेश चौगुले, प्रमोद शेवाळे, अमोल बन्ने, बबन जामदार, प्रमोद माळी, गजानन आरगे, दादासो शेवाळे, युवराज मोरे, अनिल पाटील, सचिन पाटील, सूरज चौगुले, बंडू माळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.