शिरोळ : कोल्हापूर जिल्ह्यातील बस्तवड-अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून मोठी दुर्घटना सकाळी घडली होती. यामध्ये अकिवाट तालुका शिरोळ येथील सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अजून दोघे बेपत्ता असून शोध सुरू आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी अरुण कांबळे व सागर माने हे लाइफ जॅकेट परिधान करून पाण्यातून चालत वाट काढत जात होते. त्यावेळी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अन्य सात नागरिक ट्रॅक्टरमधून अकिवाट बस्तवाड दरम्यान असणाऱ्या ओतावरील पाण्यातून सकाळी दहा वाजता प्रवास करत होते. यामधील काही नागरिक केळी आणण्यासाठी जात होते. पाण्याच्या प्रचंड वेगाने ट्रॉलीला पाण्यात खेचल्यामुळे ट्रॉली पलटी झाली आणि त्याने ट्रॅक्टरलाही पाण्यात ओढले. त्याचबरोबर ट्रॅक्टर मधील सर्वजण पाण्यात कोसळले.
हे सर्व पाणीपुरवठा कर्मचारी अरुण कांबळे आणि सागर माने यांनी पाहिले व त्यांच्या अंगात लाइफ जॅकेट असल्यामुळे त्यांनी तात्काळ पाण्यात उड्या घेतल्या आणि वाहून जाणाऱ्या आठ जणांपैकी तीन जणांना त्यांनी सुखरूप बाहेर काढले. त्यापैकी दोघे स्वतः पोहोत बाहेर आले. तर दोघांना रेस्क्यू फोर्सच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यामध्ये सरपंच पती सुहास पाटील यांचा नाका तोंडात पाणी गेल्याने गुदमरून मृत्यू झाला व एकाची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. सुखरूप बचावलेल्यांमध्ये अकीवाट येथील श्रेणिक चौगुले व रोहीदास माने व खिद्रापूर येथील केळी व्यापारी अंगद मोहीते, अझहर आलासे, प्रदीप पाटील यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी गेलेल्या सरपंच पतीचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
प्रशासनाकडून एनडीआरएफ व रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून बेपत्ता असणाऱ्या दोघांचे युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. पण अद्याप दोघे बेपत्ता आहेत. त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार, माजी सरपंच आण्णासो हसुरे यांचा समावेश आहे.