Saturday , June 6 2026
Breaking News

‘बातमीपासून वृत्तपत्रापर्यंत’चा रोमांचक प्रवास; विद्यार्थ्यांनी अनुभवली पत्रकारितेची दुनिया!

Spread the love

 

विजयवाणी कार्यालय व अत्याधुनिक प्रिंटिंग युनिटला सरकारी सरदार्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

बेळगाव : दररोज हातात पडणारे वृत्तपत्र नेमके तयार कसे होते? एका छोट्याशा बातमीचे हजारो प्रतींमध्ये रूपांतर कशा प्रक्रियेतून घडते? या प्रश्नांची उत्तरे सरकारी सरदार्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली. कर्नाटकातील सर्वाधिक खपाचे आणि अग्रगण्य कन्नड दैनिक ‘विजयवाणी’च्या कार्यालयासह होनगा येथील अत्याधुनिक प्रिंटिंग युनिटला दिलेल्या शैक्षणिक भेटीत ५५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पत्रकारिता आणि वृत्तपत्र निर्मितीचे जग जवळून पाहिले.

वृत्तपत्राच्या निर्मितीमागील प्रत्येक टप्प्याचा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्सुकतावर्धक ठरला. बातमी संकलन, संपादन, संगणकीय पृष्ठरचना, छपाई आणि वितरण अशा संपूर्ण प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना सविस्तरपणे देण्यात आली. संपादकीय विभागातील कामकाज पाहताना वृत्तपत्रातील प्रत्येक बातमीमागील मेहनत आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.

विजयवाणीचे उपसंपादक आणि प्रिंटिंग विभागातील तज्ज्ञ कर्मचाऱ्यांनी पत्रकारितेतील विविध पैलू उलगडून सांगितले. बातम्यांची निवड कशी केली जाते, माहितीची पडताळणी का आवश्यक असते, पृष्ठरचना कशी केली जाते आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अल्पावधीत हजारो प्रतींची छपाई कशी केली जाते, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांच्या जिज्ञासेचे समाधान करण्यात आले.

या भेटीतील सर्वाधिक आकर्षण ठरले ते होनगा येथील आधुनिक प्रिंटिंग युनिट. वेगाने धावणाऱ्या विशाल छपाई यंत्रांमधून काही क्षणांत वृत्तपत्रांच्या प्रती बाहेर पडताना पाहून विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले. वृत्तपत्र निर्मितीमागील तंत्रज्ञान, नियोजन आणि मानवी श्रम यांचा संगम त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला.

यावेळी विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रातील करिअरच्या संधी, पत्रकारांची सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही व्यवस्थेत प्रसारमाध्यमांची भूमिका याविषयीही सखोल माहिती देण्यात आली. त्यामुळे ही भेट केवळ शैक्षणिक न राहता विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.

या शैक्षणिक भेटीत शिक्षक रणजीत चौगुले, हनुमंत मास्तीहोळी आणि शिवानंद मरबाशेट्टी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पत्रकारिता क्षेत्राबद्दलची आपली उत्सुकता व्यक्त केली.

वाचन संस्कृती, माहितीचे महत्त्व आणि पत्रकारितेविषयी आदर निर्माण करणारी ही भेट विद्यार्थ्यांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

संध्या सुरक्षा योजनेत मोठा गैरप्रकार; अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येत बेळगाव जिल्हा अव्वल

Spread the love  बेळगाव : वृद्धांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *