विविध संघटनांची मागणी ; उपतहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बांगलादेशात काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचे त्यागपत्र राष्ट्रपतींकडे सोपवून देशातून पलायन केले. बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे, त्यामुळे बांगलादेशातील हिंदू नागरिकांनी मंदिरांचे संरक्षण करा, या मागणीचे निवेदन विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालय मार्फत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना दिले.
निवेदनातील माहिती अशी, सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे. बांगलादेशात २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक हिंदूंची उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, दुकाने लुटणे, हिंदू मंदिरांची तोडफोड करणे, आगी लावणे, हिंदु महिलांवर अत्याचार करणे, विस्थापित केले जात आहे. हिंदू नगरसेवकासह एका पत्रकाराचीही हत्या झाली. त्यामुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न रहाता हिंदु समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, यासह विविध मागण्या करण्यात आले आहेत. उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांकडे पाठवले.
श्रीराम सेना हिंदुस्थान तालुका अध्यक्ष श्रीनिवास चव्हाण, योगशिक्षक जे. डी. शिंदे, बजरंग दल जिल्हा संयोजक अजित पारळे, हिंदवी स्वराज्य संघटनेचे युवराज मोरे, डॉ. चंद्रशेखर खोत, श्रीराम सेना कर्नाटकचे अमोल चेंडके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजित पाटील, विठोबा देव प्रतिष्ठानचे अभिनंदन भोसले, विठोबा भजनी मंडळाचे पांडुरंग मोरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राजेश आवटे, हिंदू जनजागृती समितीचे अनिल बुडके, योगेश चौगुले
सनातन संस्थेचे अविनाश पवार व दिलीप काळभर, हिंदवी स्वराज्य संघटना माऊली युवक मंडळाचे सागर केसरकर, निवृत्त सुभेदार युवराज हवालदार, सद्गुरू तायक्वांदोचे बबन निर्मले, निवृत्त सैनिक चारुदत्त पावले, उमेश आंबले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta