बसव मृत्युंजय स्वामी; वकील संघटना करणार नेतृत्व
निपाणी (वार्ता) : लिंगायत समाजाला २/अ मध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून आरक्षण मिळावे, यासाठी पाच वर्षापासून लढा सुरू आहे. तरीही शासनाने कोणतीच भूमिका घेतलेली नाही. परिणामी राज्यातील लिंगायत समाजातील वकील संघटनेच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे निश्चित केले आहे.
आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी (ता.२२) बेळगाव येथील गांधी भवनात उत्तर कर्नाटकातील वकील संघटनेचे अधिवेशन होणार आहे. यावेळी लिंगायत समाजातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माहिती कुडल संगम पिठाचे बसव मृत्युंजय स्वामी यांनी केले. येथे बुधवारी (ता.११) आयोजित बैठकीत ते बोलत होते.
निलेश हत्ती यांनी स्वागत केले. स्वामी म्हणाले, भाजप सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेसचे सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे अनेकदा आरक्षणबाबत बैठका झाल्या आहेत. कुडलसंगम ते बंगळुरपर्यंत मोर्चे काढले आहेत. तरीही सरकारने समाजाला आरक्षण दिलेले नाही. लिंगायत समाजातील आमदारांशी याबाबत सातत्याने चर्चा केली आहे. त्यांनीही आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
अधिवेशनात बेळगाव, चिक्कोडी, विजापूर, हुबळी, धारवाड, कोप्पळ, हावेरी जिल्ह्यातील वकील संघटनेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निवेदन देण्यात येणार आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास कित्तूर चन्नम्मा चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाणार असल्याचे सांगितले.
वकील संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी सी.ए. परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल भोज येथील स्नेहल कमते हिचा स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष आर. एम. संकपाळ, बी. आर. औरनाळे, महेश दिवाण, ए. एस. मुर्तले, एस. एस. चौगुले, व्ही. बी. संकपाळ, के. ए. चौगुले, एस. एस. पाटील, आर. आर. पाटील, रवी गुळगुळे, संजय कमते, संजय भदरगडे, किरण पाटील, अनिल पाटील, ए. आर. पाटील उपस्थित होते.