बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे : निपाणीत गृहमंत्री शहांविरोधात काँग्रेसचा मोर्चा
निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देऊन १९५० मध्ये संपूर्ण भारतीयांना पृथ्वीवरच स्वर्गसुखाची अनुभूती दिली आहे. असे असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल संतापजनक वक्तव्य करून आपली पात्रता दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसून राष्ट्रपतींनी विशेष अधिकाराचा वापर करून गृहमंत्री शहा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी बुडा आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद निपाणीतही उमटले. सोमवारी निपाणी ब्लॉक काँग्रेस आणि बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस यांच्यावतीने निपाणीत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी गृहमंत्री शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रारंभी धर्मवीर संभाजीराजे चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा जुना पीबी रोडवरून तहसीलदार कार्यालयात गेल्यानंतर तहसीलदार एम. एन. बळीगार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवून गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, युवा नेते सुजय पाटील, टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकु पाटील, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, भून्याय मंडळ सदस्य अब्बास फरास, नगरसेवक ॲड. संजय चव्हाण, रवी श्रीखंडे, अरुण आवळेकर, नवनाथ चव्हाण, अन्वर हुक्केरी, अवधूत गुरव, अल्लाबक्ष बागवान, युवराज पोळ, जीवन घस्ते, रियाज बागवान, प्रतिक शहा, प्रशांत हंडोरी, महादेव कौलापुरे, बाळू कमते, अमृत ढोले, सुशांत खराडे, माजी नगराध्यक्षा जयश्री लाखे, ब्लॉक महिला काँग्रेस अध्यक्ष वर्षा चव्हाण, दिपाली मोहीते, वैशाली खोत यांच्यासह काँग्रेस तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.