
निपाणी : येथे महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील बेरोजगार तरूणांसाठी शिवजयंतीचे औचित्य साधून रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती करणारे पत्र माजी खासदार संजय मंडलिक यांनी नुकतेच उद्योगमंत्री उदय सामंत यांना पाठवले आहे. याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांचे शिष्टमंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडलिक यांना मुरगुड येथे भेटले होते.
गेली सहा दशके झाली बेळगाव मराठी सीमाप्रश्नाचा लढा लोकशाही मार्गाने सुरू आहे. तसेच सीमाप्रश्नाचा दाखल केलेला खटला २००४ पासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मागील काहीं वर्षात कर्नाटक शासनाचा मुजोरपणा वाढला असून सीमाभागतील मराठी भाषा संपविण्यासाठी ते सर्व बाजूंनी मराठी माणसाची कोंडी करत आहे. त्यात कानडी येत नसल्यामुळे सीमाभागातील मराठी तरूणांना कर्नाटकातील नोकऱ्यामधून जाणीवपूर्वक डावलले जाते. त्यामुळे सीमावर्ती भागातील मराठी तरूण नोकरीसाठी आणि रोजगारासाठी पुर्णपणे नजिकच्या महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतींवर अवलंबून आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती, सीमाभागातील मराठी माणसाची होणारी गळचेपी वेळोवेळी महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून देत असते. अलिकडच्या काळात महाराष्ट्र शासनाने बेळगाव सीमाभागातील दावा केलेल्या ८६५ गावातील मराठी माणसांना महाराष्ट्राचेच रहिवासी समजून त्यांच्यासाठी शासनाच्या बहुतेक योजनांबरोबरच शासनाच्या नोकर भरतीतील सामान्य श्रेणीमध्ये सामावून घेतले आहे.
सीमाभागातील बेरोजगारीने पिचलेल्या बेरोजगार तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांनी सीमाभागात महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार महामेळावा घेण्यात यावा, यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्यामार्फत तत्कालीन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला प्रतिसाद देऊन महाराष्ट्र शासनाने शिवजयंतीचे औचित्य साधून, १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथे रोजगार महामेळाव्याचे आयोजन केले होते. सदर रोजगार मेळाव्याला सीमाभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून, पाच हजारावर बेरोजगार तरूणांनी हजेरी लावली होती. तर मुलाखती अंती तब्बल सतराशे तरूणांना विविध महाराष्ट्रातील अस्थापनांकडून ताबडतोब नोकरीची नेमणूक पत्रे देण्यात आली होती. मेळावा यशस्वी झाल्यामुळे सीमाभागातील बेरोजगार तरूणांच्यामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सदर मेळाव्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आवर्जून हजेरी लावली होती. मेळाव्याला संबोधीत करतांना, युवकांचा प्रतिसाद पाहून, त्यांनी सीमाभागासाठी असा रोजगार मेळावा महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी शिवजयंती दिवशी आयोजित करण्याचे अश्वासन दिले होते.
गेल्यावर्षी काहीं तांत्रिक कारणामुळे सीमाभागातील या रोजगार महामेळाव्याचे आयोजन होऊ शकले नाही. त्यामुळे सीमाभागातील बेरोजगार युवकांच्याकडून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, निपाणी यांचेकडे रोजगार महामेळाव्याबाबत विचारणा होत असून तशी मागणी जोर धरत आहे. यावर्षी महाराष्ट्रामध्ये परत महायुतीचे सरकार सत्तेवरती येऊन उद्योग मंत्रीपद उदय सामंत यांचेकडेच आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, निपाणीच्या वतीने अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांनी युवकांच्या मागणीची दखल घेऊन सीमाभागासाठी रोजगार महामेळाव्याचे आयोजन येत्या शिवजयंती दिवशी करण्याबद्दल पाठपुरावा सुरू केला. गेल्या महामेळाव्याला माजी खासदार संजय मंडलिक हजर होते. लक्ष्मीकांत पाटील यांनी मुरगुड येथे नुकत्याच झालेल्या सत्कारावेळी रोजगार महामेळाव्याबाबत संजय मंडलिक यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. त्यावेळी मंडलिक यांनी सीमाभागातील बेरोजगार युवकांच्यासाठी यावर्षी महाराष्ट्र शासनाला रोजगार मेळावा घेण्याबद्दल आठवण करून देऊ, असे सांगितले होते. त्याप्रमाणे मंडलिक यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना तशा आशयाचे पत्र लिहून सीमाभागातील बेरोजगार युवकांचा सहानुभुतीपुर्वक विचार करून, येत्या शिवजयंती दिवशी महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार महामेळाव्याचे आयोजन करावे अशी विनंती उद्योग मंत्र्यांना केली आहे. याचा फायदा सीमाभागातील शेकडो बेरोजगार युवकांना होणार असलेने त्याची चर्चा युवक वर्गातून होतांना दिसत आहे.
दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनाही सीमाभागातील मराठी भाषिकांबाबत तळमळ होती. काळम्मावाडीचे पाणी सीमाभागाला देण्यासाठी त्यांचा पुढाकार मोठा होता. तोच वारसा आता संजय मंडलिक सीमाभागातील रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने पुढे चालवत आहेत. याबाबत सीमावासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta