निपाणी (वार्ता) : येथील रामनगर, अष्टविनायकनगर, कमलनगर परिसरात रस्ते, वीज, पाणी, गटारी अशा मूलभूत सुविधांचा वाणवा असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आता आमदार शशिकला जोल्ले यांना मंगळवारी (ता. १४) नागरिकांनी दुसऱ्यांदा निवेदन देऊन सोयी सुविधा राबविण्याची मागणी केली.
निवेदनातील माहिती अशी, बऱ्याच वर्षापासून वरील भागात पथदीप, रस्ते गटारी नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गटारी अभावी अनेक नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात लहान मोठे खड्डे काढून त्यामध्ये सांडपाणी सोडत आहेत. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला असून रोगराईची भीती व्यक्त होत आहे. विविध ठिकाणी पथदीप नसल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी ये-जा करणे कठीण होते. याशिवाय चोरीच्या घटनाही घडण्याची शक्यता आहे. शहरा बाहेर असलेल्या या उपनगरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांची अडचण होत आहे. तरी लोकप्रतिनिधींनी या विभागाकडे लक्ष देऊन मूलभूत सुविधा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आमदार शशिकला ज्वोल्ले यांनी, निवेदन स्वीकारून लवकरच रस्ते, पाणी, गटारी आणि पथदीप अशा मूलभूत सुविधा देण्याची ग्वाही दिली. यावेळी बाळासाहेब तराळ, संजय सूर्यवंशी, शंकर लोखंडे, डॉ. एस. एम. सांगावे, शैलेंद्र कांबळे, चेतन संकपाळ, शिवानंद मठपती, रवी खोत, प्रमोद नाईक, अशोक नाईक, सुरेश शेळके, विनायक नाईक, राजू शेळके, रमेश कदम, मल्लेश तराळ, संदेश सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta