तहसीलदारांना निवेदन : पोलिसांनीही दबाव आणू नये
निपाणी : यावर्षी होणार्या गणेशोत्सवावर कर्नाटक सरकारने बंदी घातलेली आहे. तरीही यावर्षीही बैठक घेऊन सर्व गणेश मंडळांनी गणेश उत्सव साजरा करण्याचे निश्चित केलेले आहे. तरी सदर गणेश मंडळांच्या सर्व अटी व नियम आपण मान्य करून गणेश मंडळांना गणेश उत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे. आठवडाभरात निर्णय न दिल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दिला आहे. या आशयाचे निवेदन शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांसह श्री गणेश उत्सव महामंडळातर्फे नगरसेवक विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई सरकार सुनील पाटील, अॅड. निलेश हत्ती व मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी (ता.17) तहसीलदार डॉ. मोहन भस्मे, उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांना देण्यात आले.
सकाळी 10.30 वाजता येथील धर्मवीर संभाजी चौकापासून गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. येथील नगरपालिका कार्यालयाजवळ आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ’उत्सवाला परवानगी द्या अन्यथा खुर्च्या खाली करा,’ ’गणेश उत्सव आमच्या हक्काचा’ यासह विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. त्यानंतर तहसीलदार डॉ. भस्मे यांना निवेदन देण्यात आले.
नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी, कोरोनामुळे सरकारने सर्व मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यास निर्बंध घातलेली आहेत. त्यामुळे कुंभार (मूर्तिकार), मंडप डेकोरेटर्स, लाईट डेकोरेटर्स, वाद्य (वाजंत्री) असे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने निवडणुकीतील प्रचार व स्पीकर अशा गोष्टींना परवानगी दिली आहे त्याच प्रमाणे गणेशोत्सव मंडळाला सुद्धा परवानगी द्यावी. आठवडाभरात याबाबत निर्णय न दिल्यास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
अॅड. निलेश हत्ती यांनी, सरकारने गणेश उत्सवासाठी जे निर्बंध घातलेले आहेत, त्या निर्बंधामध्ये बदल करून गणेश उत्सव साजरा करण्यास परवानगी देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. तहसीलदार डॉ. भस्मे, उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांनी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकार्यांना पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, माजी सभापती सुनील पाटील, संजय सांगावकर डॉ. जसराज गिरे, दत्ता नाईक, संजय पावले, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, दीपक सावंत, श्री. चव्हाण, सुरज राठोड, प्रतिक शहा, श्रेयस आंबले, बसवराज नाईक, यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
मूलभूत सोयी सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांचे आमदार जोल्ले यांना निवेदन
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील रामनगर, अष्टविनायकनगर, कमलनगर परिसरात रस्ते, वीज, पाणी, गटारी …