दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनचा पुढाकार ; स्वच्छतेसह विजेची सोय
निपाणी : शहर आणि उपनगरात गणेशमूर्ती आणि गौरीचे विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेसह दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि विविध संघटनांच्या पुढाकारातून ४ ठिकाणी गणेशमूर्ती, गौरीचे विसर्जन व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
रामनगर, मराठा मंडळाजवळील हवेली तलाव आणि अंमलझरी रोडवरील तलाव या ठिकाणी विसर्जनासाठी सोयी उपलब्ध केल्या आहेत. परिसरात स्वच्छतेबरोबरच प्रकाशाचीही सोय करण्यात आली आहे. यंदाच्या सततच्या पावसामुळे तलाव व विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे गणेश मंडळ कार्यकर्ते व भक्तांनी अंधार होण्यापूर्वीच विसर्जन करण्याचे आवाहन नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी केले आहे. प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या भावनेतून दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, हेल्थ क्लब आणि जायंट क्लबतर्फे सलग ९ वर्षांपासून स्वमालकीच्या खणीत विसर्जन उपक्रम राबविला जात आहे. यंदाही फाउंडेशनचे संस्थापक व टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष सयोजित (निकू) पाटील यांच्या नेतृत्वाखाली घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती, गौरी विसर्जनावेळी निर्माल्य संकलन व मूर्तिदानाचे आवाहन करण्यात आले आहे.
भाविकांच्या सोयीसाठी गौरीच्या निर्माल्य संकलनासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत घरगुती विसर्जनासाठी पाणी व प्रकाशाची स्वतंत्र सोय उपलब्ध राहणार आहे. या उपक्रमात फाउंडेशनचे रमेश भोईटे, रणजित मगदूम, वसंत धारव, पुंडलिक कुंभार, नारायण यादव, सागर पाटील यांसह अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत असल्याचे निकू पाटील यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta