निपाणी (वार्ता) : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही क्षमा असावी, अशी प्रार्थना करत सार्वजनिक गणेश मंडळासह गणेशभक्तांनी शनिवारी (ता. ६) गणरायांना पारंपारिक वाद्यांच्या गजरात “पुढच्या वर्षी लवकर या”च्या घोषणात निरोप दिला. दहा दिवसांच्या कालावधीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. विसर्जनाच्या दिवशी जल्लोष शिगेला पोहचला असला तरी गणरायांच्या विसर्जनावेळी भावपूर्ण वातावरण होते.
प्रथेप्रमाणे अनंत चतुर्दशीला सार्वजनिक मंडळांच्या गणेश बाप्पांच्या विसर्जनाला दुपारपासून सुरुवात झाली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या भव्य मिरवणुका आपापल्या गल्लीतून सुरू झाल्या होत्या. बोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू होता. सकाळपासूनच गणेशाच्या निरोपाची तयारी करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात लगबग सुरू होती. गणेशमूर्तीच्या समोरील फळे व अन्य वस्तूंच्या लिलावाचा कार्यक्रम मंडपातून झाला. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ केला. शहरातील विविध गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका एकापाठोपाठ सुरू होत्या. येथील महादेव गल्ली महादेव गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक तब्बल ६ तास सुरू होती. साखरवाडी राजाची र्आकर्षक विसर्जन मिरवणूक काढली. तर टपाल कार्यालया जवळील विघ्नहर्ता तरुण मंडळांनी महिला लेझीम पथकाच्या निनादात विसर्जन मिरवणूक काढून मूर्तींचे विसर्जन केले. शहराबाहेरील विविध खण, हवेली तलाव, नदी, विहिरीत मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
यावर्षी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने डीजे आणि डॉल्बीवर पूर्णपणे बंदी घातली होती. त्यामुळे पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढण्यासह विसर्जन वाहनांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta