निपाणी : येथील महात्मा गांधी रुग्णालयामध्ये किडणी आजार रुग्णांच्या सोयीसाठी डायलिसिसची नवीन ६ मशीन आलेली आहेत. अनेक महिने जोडणीच्या नावाखाली मशीन तशीच पडून आहेत. त्यामुळे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती डायलिसिस रुग्णांची झाली आहे. तरी आरोग्य विभागाने त्याकडे लक्ष देऊन तत्काळ मशीन जोडण्याची मागणी डायलिसिस रुग्णांतून होत आहे.
शहराला तालुक्याचा दर्जा मिळून अनेक वर्षे उलटली. शिवाय शहरातून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. येथील महात्मा गांधी रुग्णालय शहर व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. तेथे नवीन सुसज्ज इमारतही बांधली आहे. यापूर्वी या रुग्णालयात किडणी रुग्णांसाठी डायलिसिस मशीन नसल्याने रुग्णांना बेळगाव, कोल्हापूरला जावे लागत होते. वेळ व पैशाचा अपव्यय होत होता. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने या रुग्णालयात डायलिसिसची ६ मशीन उपलब्ध केली आहेत. अद्याप त्यांची जोडणी न झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. परिणामी रुग्णांना पुन्हा बेळगाव, कोल्हापूरची वाट धावी लागत आहे. आरोग्य विभागाने मशीन जोडून गरजू रुग्णांना लाभ मिळवून द्यावा. त्यामुळे चिक्कोडी, गोकाक, कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणी होणारे हेलपाटे वाचणार आहेत. याबाबतची माहिती संबंधित विभागाला फोर-जेआर ह्युमन राइटस् केअर ऑर्गनायझेशनने दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta