बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळेंची माहिती; शासकीय विश्रामधामात बैठक
निपाणी (वार्ता) : येथे २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यात २५० मौलाना आझाद इंग्लिश मीडियम स्कूल ला मंजुरी दिली होती. २०५-२६ या शैक्षणिक सालात १०० अशा शाळा सुरू करण्यासाठी लागणारे अनुदान, शिक्षक वर्ग, फर्निचर, इमारत, भाडे अशा सर्व सुविधा पुरविल्या आहेत. या योजनेसाठी एकूण ५०० कोटी रुपयांची तरतूद करून त्यापैकी पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. केवळ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाच येथील जात असून इतरांनी हे श्रेय घेऊ नये, असे आवाहन बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी केले. येथील शासकीय विश्रामधामात रविवारी(ता.१४) सायंकाळी आयोजित मुस्लिम समाजाच्या बैठकीत ते बोलत होते.
चिंगळे म्हणाले, दोन टप्प्यात अशा शाळांचा आदेश काढला असून जिल्ह्यात निपाणी, अथणी, अंकलगी, रामबाग येथे चार शाळांना मंजुरी दिली आहे. एकूण ९३ शाळा कार्यान्वित होणार आहेत. येथील शाळेच्या परवानगीसाठी माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांनीही पत्र दिले होते. पालकमंत्री सतीश सतीश जारकीहोळी, खासदार प्रियंका जारकीहोळी, माजी मंत्री रकुमार पाटील, संबंधित शिक्षण मंत्री, अल्पसंख्यांक अभिवृद्धी निगमचे मंत्री जमीर अहमद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निपाणीच्या शाळेचा समावेश करण्यात यश मिळवले आहे. ही योजना म्हणजे सिद्धरामय्यांची स्वप्नपूर्ती आहे. अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने अशांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे.
काँग्रेस सरकार धर्म जात भाषा पलीकडे जाऊन न्याय देण्याचे काम करत आहे. सोमवारी या शाळेच्या औपचारिक उद्घाटन होणार असल्याचे समजते. मात्र याबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियंका जारकीहोळी, आपणासह काँग्रेस पदाधिकारी व अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागे गौडबंगाल काय? याबाबत अल्पसंख्यांक समाजाचे जिल्हा पदाधिकारी पुजारी, तालुका पदाधिकारी प्रवीण नंदार आणि प्राचार्याशी विचारपूस केले असता याबाबत कोणालाच काही माहिती दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही पालकमंत्री, खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तारखेस या शाळेचे उद्घाटन करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सगळे यांना भेटून सांगितले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे चिंगळे यांनी सांगितले.
यावेळी निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, सुजय पाटील, के. एम. बागवान, दीपक सावंत, ॲड. संजय चव्हाण, बक्तीयार कोल्हापुरे, संजय पाटील, बशीर आतार, विनोद बल्लारी समीर काझी, शौकत बागवान, सुभान नायकवडे, रवींद्र श्रीखंडे, टिपू ननदी झाकीर कादरी, जावेद पटेल, के. बी. वठारे, रामचंद्र निकम फारुख पटेल, बाळासाहेब कमते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta