

निपाणी (वार्ता) : यावर्षी शिक्षण खात्याने दसऱ्याची वाढीव सुट्टी दिल्याने निपाणी शहराच्या ग्रामीण भागातील रिकामे असलेले बालचमू चार-पाच दिवसांपासून गड-किल्ले साकारण्यात गुंतले होते. अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या असून सध्या त्यावर सैनिक ठेवण्यासह विद्युत रोषणाई केली जात आहे. शहरासह उपनगरांतील किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या आहेत. यंदा ३४ पेक्षा अधिक ठिकाणी विविध प्रकारचे लहान मोठे गड – किल्ले साकारल्याने शिवसृष्टी अवतरल्याचे चित्र दिसत आहे. शहराबरोबरच उपनगरातील गल्ली – बोळासह चौकाचौकांत किल्ले बनविले जात आहेत. आकर्षक सजावटीच्या माध्यमातून इतिहासाचा वारसा जोपासला जात आहे. कोवळ्या हातांनी दगड, माती व विटांपासून साकारलेल्या गड – किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहावयास मिळत आहेत.
यंदाही बालचमूंनी शिवनेरी, पुरंदर, पन्हाळा, रायगड, जंजिरा, प्रतापगड, राजगड, सामानगड, सिंहगड, तोरणा, वल्लभगड, सिंधुदुर्ग यासह अन्य ऐतिहासिक गड – किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. त्यावर राजदरबार, राणीमहाल, मंत्र्यांचे वाडे, तलाव, स्तंभ, धान्य कोठार, दारूगोळा कोठार, गुहा यासह कडेकपारी असे बारकावे पाहावयास मिळत प्रगतीनगर, महादेवगल्ली, बागवानगली, चिमगावक रगल्ली, साखरवाडी, रामनगर, मेस्त्री गल्ली, शिवाजीनगर, प्रगतीनगर, प्रतिभानगर, आंदोलननगर, शाहूनगर परिसरासह शहरात किल्ले तयार करताना मुलांचे गट दिसत आहेत.
——————————————————————–
तयार किल्ल्यांच्या प्रतिकृती
शहरातील विविध चौकासह बाजारपेठ आणि रस्त्यावर व्यवसायिकांनी विविध गड किल्ल्याच्या प्रतिकृती विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. काही उच्चभ्रू सोसायटी मधील लहान मुले त्याची खरेदी करत असून शिवाजी महाराजांचे पुतळे, सेवेकरी, प्राणी पक्षी अशा मातीच्या व प्लास्टिकच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta