

लेखिका सुचिता घोरपडे; दिवंगत महादेव मोरेंच्या ‘भरारी’ पुस्तकाचे प्रकाशन
निपाणी (वार्ता) : दिवंगत साहित्यिक महादेव मोरे यांनी अस्सल ग्रामीण भागात कथा, प्रवास वर्णन, सर्वसामान्यांची दुःखे शब्दबद्ध केले आहेत. त्यांच्या लेखनामुळे ग्रामीण साहित्यात मोठी भर पडली आहे. त्याची कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राने दखल घेतली आहे. त्यामुळे निपाणी शहराचे नाव सर्वत्र लवकिक झाले आहे. त्यांच्या साहित्याचा वारसा जोपासून पुढे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असे मत युवा लेखिका सुचित्रा घोरपडे यांनी व्यक्त केले.
निपाणी नगरीचे भूषण, दिवंगत साहित्यिक महादेव मोरे यांच्या ‘भरारी’ या पन्नासाव्या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार पेठेतील विठ्ठलराव मोरे सभागृहात लेखिका सुचिता घोरपडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
घोरपडे म्हणाल्या,मोरे काकांनी हे पुस्तक मला अर्पण केले आहे, हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. त्याचबरोबर मी आणखी जबाबदारीने लेखन करण्याचे भान सतत जागृत ठेवण्यासाठी त्यांचा हा आशीर्वाद आहे. त्यांचे साहित्य वाचतच मी लहानाची मोठी झाले. निपाणीचे नाव त्यांच्या साहित्यिक कामगिरीने मोठे झाल्याचे सांगितले.
प्रा.डाॅ. अच्युत माने म्हणाले महादेव मोरे यांनी कष्टकरी श्रमकरी यांचे वास्तव चित्र आपल्या साहित्यात रेखाटले. वंचित, परिघाच्या काठावरील व परिघाबाहेरील लोकांचे दुःख आपल्या कथा- कादंबऱ्यातून मांडले. पिठाची गिरणी चालवत आजन्म साहित्य सेवा केली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पन्नासावे पुस्तक ‘भरारी’ आज प्रकाशित होत आहे. त्यांच्या सत्यवादी लेखणीने वंचिताच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम केल्याचे सांगितले.
प्रारंभी दिवंगत साहित्यिक महादेव मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.प्रा. नानासाहेब जामदार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास डॉ. सुनील ससे, डॉ. सुनीता देवर्षी, प्रा. विलास उपाध्ये प्रा.डाॅ. एन. डी. जत्राटकर, प्रा. एम.आर. ढेकळे, प्रा. बाळासाहेब सुर्यवंशी, कबीर वराळे, कृष्णात मोरे, सुहास मोरे, प्रा.आनंद संकपाळ, प्रा. डाॅ.श्रीपती रायमाने, प्रा. मंगलदास शिप्पूरकर, रमेश देसाई, प्रा. डाॅ. अशोक डोनर, प्रा.विठ्ठल घाटगे, प्रा. बी.एस. हिरेमठ, प्रा. सदानंद झळके, विजय मेत्राणी, प्रमोद कांबळे, प्रा.सुरेश कांबळे, संतोष माने, प्रकाश जाधव, नितीन परीट, सुरज पाटील यांच्यासह मोरे कुटुंबीय आणि साहित्य क्षेत्रातील रसिक उपस्थित होते. प्रा. शिवाजी मोरे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta