

बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे ; सर्कलच्या सुशोभीकरणासाठी ३.२५ कोटीचा निधी
निपाणी (वार्ता) : निपाणी -कोट्टलगी राज्यमार्गावर असलेल्या निपाणी येथील न्यायालयाजवळ क्रांतिवीर संगोळी रायन्ना सर्कल आहे. त्याच्या सुशोभीकरणासह चबूतर्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ३.२५ कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंजूर केला आहे. लवकरच या १५ फुट पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी दिली. येथील शासकीय विश्रामधामात शनिवारी (ता.२५) आयोजित धनगर समाजाच्या बैठकीत ते बोलत होते.
चिंगळे म्हणाले, सर्कलच्या पाठीमागील बाजूस चुकीचा रस्ता असून त्याची दुरुस्ती करून मध्यवर्ती ठिकाणी पुतळ्याची उभारणी करण्यात येणार आहे. या कामासाठी दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी, सेक्रेटरी सत्यनारायण व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. अधिकाऱ्यांनी तीन वेळा या ठिकाणी भेट देऊन त्याबाबतचा अहवाल मंत्री महोदयांना पाठवला होता. याबाबत राज्य धनगर समाजाचे संचालक महादेव कौलापुरे यांनी सतत याबाबत पाठपुरावा केला आहे. बेळगाव जिल्ह्यात हा पुतळा सर्वाधिक उंचीचा असून निपाणीच्या इतिहासात ही ऐतिहासिक घटना आहे.
या कामाबाबत बंगळूर येथे निविदा मंजुरीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. तीन महिन्यात सर्कलच्या सुशोभीकरणाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर आठ महिन्याच्या कालावधीत स्वातंत्र्य दिन किंवा डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन आहे. या कामासाठी सिद्धरामय्या पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.
बैठकीस निपाणी तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष आर. के. धनगर, हालशुगर संचालक श्रीकांत बन्ने, सिद्धू नराटे, महादेव गोकार, राहुल ढोणे, सिद्राम पुजारी, सिद्धलिंग चिगरे, एस. के. दिवटे, आर. ए. बन्ने, रेवाण्णा पुजारी, महादेव बरगाले यांच्यासह तालुक्यातील धनगर समाज बांधव उपस्थित होते.
————————————————————
वाळकीतील पुतळ्यासाठी २५ लाखाचा निधी
निपाणी शहराप्रमाणेच वाळकी गावात क्रांतिवीर संगोळी रायान्ना यांच्या पुतळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून २५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून सध्या काम सुरू असून ते प्रगतीपथावर असल्याचे राज्य धनगर समाजाचे संचालक महादेव कौलापूरे यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta