

राजू पोवार ; निपाणीत रयत संघटनेची बैठक
निपाणी (वार्ता) : यावर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर जाहीर दिल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसतोड देऊ नये. शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी ऊस देण्यासाठी गडबड करू नये. शिवाय शेतकऱ्यांनी एकजूट ठेवून कार्यरत राहण्याचे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी केले. येथे आयोजित रयत संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
प्रारंभी दत्ता लाटकर यांनी प्रास्ताविकात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून कारखानदार शेतकऱ्यांची कशी लुबाडणूक करतात याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
राजू पोवार म्हणाले, चालू गळीत हंगामात कारखानदारांना प्रति टन साडेतीन हजार रुपये देणे भाग पडल्याशिवाय रयत संघटना स्वस्त बसणार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जात-पात,पक्ष राजकारण न पाहता शेतकऱ्यांच्या ऊसाला दर देण्याच्या उद्देशाने कार्यरत राहणे आवश्यक आहे. यंदा उसाचे क्षेत्र कमी असून कारखानदार शेतकऱ्यांच्या बांधावर उसासाठी येणार आहेत. त्यामुळे योग्य दर जाहीर केल्याशिवाय उसाची कांडी तोडू देऊ नये. अन्यथा शेतकरी पुन्हा आर्थिक कचाट्यात सापडणार आहे. ऊस दराच्या या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीस मुरुगा कल्याणशेट्टी, बाबासाहेब पाटील, कालगोंडा कोटगे, सुभाष चौगुले, सुभाष खोत, सागर नलावडे,विजय मंगावते, सागर हल्ल्याळ, सर्जेराव हेगडे, बबन जामदार, एकनाथ सादळकर, महादेव शेळके, बाबासाहेब कुंभार बाळकृष्ण चेंडके, तानाजी पाटील, सुनील पाटील, सागर पाटील, पिंटू कांबळे, चिनू कुळवमोडे, शिवाजी वाडेकर, पिंटू लाड, मयूर पोवार, राजू चौगुले, महादेव साळुंखे, पवन माने यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta