
निपाणी : बेळगाव सीमाभागात ‘काळा दिवस’ पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आज (दि. १ नोव्हेंबर) तज्ञ समितीचे अध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने बेळगावकडे रवाना झाले होते. मात्र, कर्नाटक पोलिस प्रशासनाने त्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावरच अडवले, त्यामुळे काही काळ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा तणाव निर्माण झाला.

खासदार माने यांना प्रवेश नाकारताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “मी संवैधानिक पदावर आहे; मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणालाही तो अधिकार हिरावून घेण्याचा हक्क नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी माने यांनी कर्नाटक प्रशासनाच्या कारवाईचा ‘दडपशाही’ म्हणून निषेध नोंदवत, बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची घोषणा त्यांनी केली. “मराठी भाषिकांचा लढा न्यायासाठी आहे, आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, वाढता तणाव पाहता पोलिसांनी खासदार माने यांना ताब्यात घेत कागल पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी या वेळी जोरदार घोषणाबाजी केली. या संपूर्ण प्रकारामुळे सीमाभागातील वातावरण पुन्हा एकदा तापले असून, या प्रकरणावर पुढील काही तासांत राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta