
निपाणी (वार्ता) : निपाणी सीमा भागातील मराठी भाषिकांची अस्मिता असलेल्या आणि दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील नगरपालिका कार्यालयावरील भगवा ध्वज जीर्ण झाला आहे. त्यामुळे हा भगवा ध्वज बदलून त्या ठिकाणी बुधवारी (ता. ५ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे.
सदरचा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि सशुरतेचे प्रतीक आहे. याशिवाय जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचारांचे आणि भारतीय संस्कृतीच्या गौरवाचे द्योतक आहे. त्यामुळे हा जीर्ण झालेला ध्वज बदलण्यात येणार आहे. आतापर्यंत कर्नाटक सरकारची भगवा ध्वजाबाबत द्वेष भावना सुरूच आहे. बऱ्याचदा हा ध्वज उतरविण्याचा प्रयत्नही झाला. हा प्रयत्न शहरासह ग्रामीण भागातील मराठी भाषिकांनी हाणून पाडला आहे. अलीकडच्या काळात सण आणि समारंभाच्या वेळी या ध्वजाच्या संरक्षणासाठी नगरपालिका आवारात पोलीस बंदोबस्तही तैनात केला जात आहे. शिवाय मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरूच आहे. नवीन ध्वजाच्या अनावरण प्रसंगी शहर व परिसरातील मराठी भाषिक, स्वाभिमानी नागरिकांनी भगव्या ध्वजाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta