
स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष नवनाथ चव्हाण; नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध
निपाणी (वार्ता) : गेल्या अनेक वर्षापासून निपाणी नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकत राहिला आहे. तो सीमा भागातील अस्मितेचा प्रतिक आहे. हा ध्वज कोणत्याही राजकीय पक्षाला सीमित नाही. केवळ हिंदू आणि मराठी भाषिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच निपाणी नगरपालिकेवर पन्नास वर्षांपासून भगवा झेंडा डौलाने फडकत आहे. ऊन, वारा पावसामुळे ध्वज जिर्ण झाला असून तो बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत मंडल पोलीस निरीक्षकांकडून कारवाई करण्याची धमकी दिली जात आहे. ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे स्वराज्य रक्षक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ चव्हाण यांनी सांगितले.
आपल्या कार्यालयात सोमवारी (ता.३) सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
——————————————————————-

नवनाथ चव्हाण म्हणाले, प्रशासनाला भगव्या झेंड्याचा एवढा तिरस्कार का? ध्वज बदलण्यासंदर्भातभगवा झेंडा फडकवणार असल्याची माहिती मिळताच झेंडा फडकवायचा नाही, अन्यथा अटक करून तुरुंगात पाठवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या झेंडा फडकवण्याचे नियोजन स्थगित केले असले तरी लवकरच गनिमीकाव्याने का होईना झेंडा फडकवणार असल्याचे सांगितले.
अजित पाटील यांनी, यापूर्वी दोन नगरसेवकांनी झेंडा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला विरोध करण्यात आला. हिंदुत्वाचा झेंडा लावण्यास मनाई असेल तर कर्नाटक प्रशासनाने तसे जाहीर करण्याचे आवाहन केले.
शिवम सूर्यवंशी यांनी, याप्रकरणी लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालून भगवा झेंडा लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे सूचित केले. यावेळी अशोक खांडेकर, राहुल माने, दिग्विजय पुंडे, रमेश कल्लोळ, विजय कामते यांच्यासह स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta