
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांची संबंधितांना सूचना; सेवा रस्त्यावर दुतर्फा होणार गटारी
निपाणी (वार्ता) : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निपाणी ते कोगनोळी परिसरात भुयारी मार्ग निर्माण केले आहेत. नागरिक आणि वाहनधारकांच्या सोयीसाठी पुन्हा येथील खरी कॉर्नर शिरगुप्पी रोड, यरनाळ रोड आणि हणबरवाडी क्रॉसवर तीन छोटे भुयारी मार्ग होणार आहेत. त्याबाबतची सूचना संबंधितांना दिल्याची माहिती बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी दिली.
खरी कॉर्नर परिसरातील महामार्ग कामाचे पाहणी करून त्यांनी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या कामावेळी सेवा रस्त्यावरील पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्ग आणि सेवा रस्त्यांच्या मध्यभागी गटारनिर्मिती केली जात आहे. मात्र खरी कॉर्नरनजीक रस्त्याचा पूर्वेच्या भाग उतार असल्यामुळे पश्चिमेला होणाऱ्या गटारीचा, फारसा उपयोग होणार नाही. महात्मा गांधी हॉस्पिटल ते न्यू हुडको कॉलनी या एक किलोमीटर अंतरापर्यंत सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार निर्मिती केली होणार आहे. तशा सूचना कंत्राटदार कंपनीला देण्यात आल्या असून, त्यांनीही तीन ठिकाणी भुयारी मार्ग आणि गांधी हॉस्पिटल ते न्यू हुडको कॉलनीपर्यंत सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार निर्मिती करण्याच्या आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, कंत्राटदार कंपनीचे प्रकल्प अभियंता अवताडे, बलराम चव्हाण, विजय दाईंगडे, दीपक सावंत, ऍड. संजय चव्हाण, रघुनाथ नाईकवडी, उत्तम कामते, अशोक लाखे, संजय शिंदे, अक्षय शेटके, लियाकत मुजावर, रामचंद्र निकम, बाळासाहेब कमते, भालचंद्र पारळे, प्रकाश पाटील, सुरेश गाडीवड्डर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta