
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी ; निपाणीत मराठा समाज वधू- वर परिचय महामेळावा
निपाणी (वार्ता) : आकाशातील ग्रह ताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही. रास-कुंडली पाहून विवाह ठरवणे चुकीचे आहे. विवाहाचे वाढते वय ही आरोग्यविषयक समस्या बनली आहे. लिंगनिदान प्रतिबंधक कायदा लागू होण्यापूर्वी गर्भजल परीक्षणाद्वारे कन्या भ्रूण नष्ट करण्याची प्रवृत्ती वाढल्याने मुलींची संख्या घटली आहे. जे मुलांच्या पालकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. घटस्फोटाचे जे आज प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी युवक-युवतींना मानसिक सजगता आणि कुटुंब मूल्यांची आवश्यक आहे. लग्नसंस्था व कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी उपयुक्त उपाययोजना व मूल्य संस्काराची गरज आहे, असे मत माजी आमदार प्रा.सुभाष यांनी केले.
येथील शुभकार्य वधू वर सूचक संघातर्फे व स्थानकाजवळील गुरुकृपा मंगल कार्यालयात रविवारी (ता.९) आयोजित सकल मराठा समाज वधू -वर परिचय महामेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक रवींद्र शिंदे होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन झाले. संघाचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब खोत यांनी स्वागत तर विश्वनाथ जाधव यांनी प्रास्तावित केले. त्यानंतर वधू वर आणि पालकांनी आपापला परिचय सांगून मेळाव्यात सहभाग दर्शविला. सायंकाळी उशिरापर्यंत मेळाव्यास वधू वर पालकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
मेळाव्यास टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, सुजय पाटील, गोपाळ नाईक, प्रा बाळासाहेब सूर्यवंशी, विनोद साळुंखे, विनोद बल्लारी, रमेश भोईटे, दीपक सावंत, संदीप यादव, अमित रामनकट्टी, राहुल शिंदे, सुनील सुतार यांच्यासह शिव कार्य वधू वर संघातील सदस्य व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta