

कर्नाटक -महाराष्ट्राला जोडणारा सर्कल दुर्लक्षित ; दिवसभर वाहतुकीची कोंडी
निपाणी (वार्ता) : कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा बोरगाव सर्कल आणि रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण अलीकडच्या काळात वाहनधारकांची संख्या वाढल्याने या सर्कल रस्त्यावरील खडी निघाली असून वाहनांचा वर्दळी धूळ आणि मातीचा त्रास होत आहे. शिवाय वाहतुकीमुळे दिवसभर कोंडी होत आहे. या महत्त्वाच्या सर्कल आणि रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकासह नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
सर्कलमधून नृसिंहवाडी, कुरुंदवाड, हुपरी, इचलकरंजी सदलगा अशा गावांची रस्ते जोडले आहेत. या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ असते. सध्या ऊस वाहतुकीच्या हंगाम सुरू असल्याने दिवसभर धुळीचे साम्राज्य पसरत आहे. याच परिसरात, हॉटेल, खानावळी, किराणासह इतर दुकाने आहेत. त्यांनाही धुळीचा त्रास होत आहे. काही महिन्यापूर्वी बांधलेल्या कीर्ती स्तंभावर धुळ बसत असल्याने स्तंभाची दुरावस्था होत आहे.
याच रस्त्यावरून इचलकरंजी, चिक्कोडी, कुरुंदवाड, हुपरी येथे नोकरी व्यवसाय आणि रोजगारासाठी अनेक दुचाकीस्वार ये-जा करतात. त्यांनाही उखडलेल्या रस्त्यासह धुळीचा सामना करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष देऊन बोरगाव सर्कल आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
—————————————————————–
केवळ आश्वासनांचा पाऊस
काही महिन्यापूर्वी विविध राजकीय पक्षातर्फे कार्यक्रम घेऊन बोरगाव सर्कलचे सुशोभीकरण, रस्त्यांचे डांबरीकरण, कीर्ती स्तंभाच्या उर्वरित कामांची आश्वासने मिळत आहेत. प्रत्यक्षात कोणतीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta